‘अॅडीनो’ विषाणूमुळे डोळ्याची साथ
By Admin | Updated: June 25, 2017 02:00 IST2017-06-25T02:00:03+5:302017-06-25T02:00:03+5:30
उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे.

‘अॅडीनो’ विषाणूमुळे डोळ्याची साथ
मेडिकल : रोज १५वर रुग्णांवर उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून कन्जेक्टिव्हायटिस’च्या (डोळे येणे) रुग्णांची संख्या वाढली आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात या विषाणुजन्य आजाराचे दररोज १५वर रुग्ण येत आहेत. यात लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. ‘अॅडीनोव्हायरस’ या विषाणुमुळे होणाऱ्या या आजाराच्या रुग्णात गंभीर आजाराचे रुग्णही आढळून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शहरातील वातावरणात दमटपणा वाढलेला आहे. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी- पडसे, खोकला, ताप अशा आजारांबरोबरच दरवर्षी या दिवसांत डोळे येण्याचीही साथ पसरते. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रु माल, त्याने वापरलेले डोळ्यांचे ड्रॉप्स आदी वस्तू वापरणे, यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असे म्हटले जाते.
त्यात तथ्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, एकदा डोळे येऊन गेले की त्या साथीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते हे खरे, पण म्हणून पुन्हा संसर्ग होणारच नाही असे नाही.
डोळे येण्याची लक्षणे
मेडिकलच्या नेत्र रोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, या आजारात डोळे लाल होणे किंवा डोळ्यात रक्तस्राव होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यातून चिपड येणे, सकाळी डोळे चिकटलेले असणे, डोळ्याला खाज व जळजळ होणे, डोळ्याला धूसर किंवा अंधुक दिसणे, पापण्यांवर सूज येणे, प्रकाश सहन न होणे, डोळे दुखणे तसेच ताप, सर्दी व घशाचे आजार होणे आदी लक्षणे दिसून येतात.