उच्चशिक्षित असूनही तुटपुंजे वेतन
By Admin | Updated: December 24, 2014 00:43 IST2014-12-24T00:43:27+5:302014-12-24T00:43:27+5:30
दोन विषयात एम. ए. करून बीएडची पदवी पूर्ण केली. नोकरीत लागल्यानंतर आपला संसारगाडा सुरळीत होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु १२ वर्षे नोकरीला होऊनही तुटपुंजे चार हजाराचे मानधन हाती पडते.

उच्चशिक्षित असूनही तुटपुंजे वेतन
महिला शिक्षिकेची आपबिती : संसारगाडा चालविताना दमछाक
दयानंद पाईकराव -नागपूर
दोन विषयात एम. ए. करून बीएडची पदवी पूर्ण केली. नोकरीत लागल्यानंतर आपला संसारगाडा सुरळीत होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु १२ वर्षे नोकरीला होऊनही तुटपुंजे चार हजाराचे मानधन हाती पडते. दोन मुलांचे शिक्षण. कुटुंबात कमावणारी एकटीच अशा परिस्थितीत मुलांची पिढी घडविणारी सीमा बिसने या शिक्षिकेला कमालीचे नैराश्य आले आहे. शासनाने आतातरी अनुदान देऊन आपल्या नशिबातील वनवास संपविण्याची मागणी घेऊन त्या मोर्चात सामील झाल्या.
सीमा शंकर बिसने असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. त्या आदर्श हायस्कूल दाभा ता. जि. भंडारात शिक्षिका म्हणून २००५ मध्ये रुजू झाल्या. आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेपोटी त्यांनी नऊ वर्षे केवळ चार हजार एवढ्या अल्पशा मानधनावर काम केले. त्यांची मोठी मुलगी पाचव्या वर्गात तर मुलगा पहिल्या वर्गात आहे. एवढ्या कमी तुटपुंज्या मानधनावर जगणे मुश्कील झाल्यामुळे त्या आपल्या शाळेला अनुदान देण्याच्या मागणीसाठी भंडारा-गोंदिया जिल्हा विना अनुदानित शिक्षक कर्मचारी एकता समितीच्या मोर्चात सहभागी झाल्या. अल्पशा मानधनात दोन वेळची भाकरी खायची की मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे असा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
शासनाने आॅनलाईन केलेल्या मूल्यांकनात त्यांची शाळा ८१ टक्के गुण मिळवून अनुदानासाठी पात्र ठरली आहे. परंतु तरीसुद्धा अद्याप शासनाने अनुदान देण्यासाठी कुठलाच निर्णय घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची पिढी घडवित असताना नैराश्याचे जीवन जगावे लागत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. किमान आतातरी शासनाने आमचा वनवास थांबवावा, अशी माफक अपेक्षा त्यांनी मोर्चात व्यक्त केली.