दलालांचे प्रशस्त नेटवर्क

By Admin | Updated: September 13, 2014 02:43 IST2014-09-13T02:43:29+5:302014-09-13T02:43:29+5:30

विविध छाप्यांमध्ये पोलिसांच्या गळाला लागलेल्या दलालांपासून मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी आहे.

Extensive network of brokers | दलालांचे प्रशस्त नेटवर्क

दलालांचे प्रशस्त नेटवर्क

नरेश डोंगरे नागपूर
विविध छाप्यांमध्ये पोलिसांच्या गळाला लागलेल्या दलालांपासून मिळालेली माहिती पोलिसांना चक्रावून टाकणारी आहे. हा गोरखधंदा करणाऱ्या ठिकठिकाणच्या काही मॉडेल्स, ड्रेस डिझायनर, तसेच छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या काही जणींची सचित्र (फोटो अल्बम) यादीच दलालांकडे आहे. सेक्स वर्कर आणि नियमित संपर्कात असलेल्या धनिक ग्राहकांचे मोठे नेटवर्क ही दलाल मंडळी संचालित करते. सेक्स वर्कर-ग्राहक परस्परांच्या थेट कधीच संपर्कात येत नाही. दलालच भेटीचा योग घडवून आणतो. तोच रक्कम ठरवतो. सेक्स वर्करच्या प्रवासाच्या तिकिटांची, येथे फिरण्याची (टॅक्सी) आणि राहण्याची व्यवस्थाही दलालच करतो. ‘आॅन डिमांड’ त्या नागपुरात येतात. काही वेळा ग्राहकाच्या पसंतीनुसार स्थळ बदलते. अर्थात ग्राहक हॉटेलमध्ये जाण्याऐवजी एखाद्या बंगल्याचा किंवा फार्महाऊसचा पत्ता दलालाला देतो.
दलालांकडून सुरक्षेची हमी मिळत असल्यामुळे सेक्स वर्कर्स त्याच्यासोबत नेईल त्या ठिकाणी जातात. वर्धमाननगर आणि तहसीलमधील दलाल तर अशावेळी चक्क बाऊंसरही सोबत ठेवतो.
पोलिसांचे हात बांधलेले
यापैकीच एकीने देहविक्रयासाठी नागपूर हे सेफ डेस्टिनेशन असल्याचेही म्हटले होते. कारण, येथे वेश्याव्यवसाय करताना पकडल्या गेल्यास पोलिसांकडून अटकेची कारवाई होत नाही.
‘दलालाकडून पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, असे सांगून ‘ती’ स्वत:ची सुटका करून घेते. पीडित म्हणून तिला (त्यांना) कायदेशीर संरक्षण असल्यामुळे पोलिसांचे हात बांधले आहेत. त्यामुळे हीच किंवा त्याच तरुणी नंतर दुसरीकडे पुन्हा वेश्याव्यवसायात सक्रिय होतात. उपराजधानीत एकाच तरुणीला अनेकवेळा पोलिसांनी वेश्याव्यवसाय करताना पकडल्याची अनेक उदाहरणे आहेत.(प्रतिनिधी)
गंगाजमुनातील वर्दळ कमी
देशातील अनेक महानगरात रेडलाईट एरिया आहेत. त्यात नागपूरच्या ‘गंगाजमुना’चाही समावेश आहे. दिशाभूल करून आणलेल्या तरुणी गंगाजमुनातील नरकात ढकलल्या जातात. प्रारंभी त्या येथे मन मारून वेश्याव्यवसाय करतात. नंतर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसायाचा भाग म्हणून त्या येथील नरकयातना सहन करतात. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे ग्राहक येथे जाण्याचे टाळतात. त्याऐवजी ते पॉश कुंटणखान्यावर जातात. तेथे तगडी रक्कम मोजतात. त्यामुळे गंगाजमुनातील वर्दळ कमी होत असल्याची ओरड ‘त्या’ भागातून ऐकू येते.
सहा महिन्यात नऊ कारवाया
गुन्हेशाखेचे सामाजिक सुरक्षा पथक गेल्या काही महिन्यांपासून चांगले सक्रिय झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या नेतृत्वातील सामाजिक सुरक्षा पथकाने पॉश कुंटणखान्यांवर धाडी घालण्यासाठी खबऱ्यांचे चांगले नेटवर्क तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशपेठ (१२ एप्रिल), यशोधरानगर (२१ मे), कोराडी (१७ जून), लकडगंज (१ जुलै), हुडकेश्वर (७ जुलै), लकडगंज (१८ जुलै), सीताबर्डी (४ आॅगस्ट), एमआयडीसी (२७ आॅगस्ट) आणि धंतोली (९ सप्टेंबर) धाड घातली. येथून पोलिसांनी १६ दलालांना अटक केली.आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या ११ अल्पवयीनांंसह ३५ सेक्स वर्कर्सची सुटका केली.

Web Title: Extensive network of brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.