मत्स्य तलावांची ठेका रक्कम भरण्यास नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:57+5:302021-05-30T04:07:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घाेषित लाॅकडाऊनमुळे राज्यातील मासेमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनुसार ...

मत्स्य तलावांची ठेका रक्कम भरण्यास नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घाेषित लाॅकडाऊनमुळे राज्यातील मासेमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही. त्यामुळे मत्स्य कास्तकारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत मत्स्य तलावांच्या ठेका रकमेचा भरणा करण्यास ३० नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे राज्यासह विदर्भातील दीड लाखाच्या जवळपास मासेमाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
उल्लेखनीय म्हणजे ‘लाेकमत’ने यापूर्वीच मासेमाऱ्यांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला हाेता. मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी यानंतर मुख्यमंत्री तसेच मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्र्यांना लाेकमतची बातमी जाेडून निवेदन सादर केले. शासनाने याची दखल घेत निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही काेराेना महामारीच्या संकटाने मासेमाऱ्यांनाही बेजार केले आहे. मत्स्य कास्तकार प्रभाकर मांढरे यांनी सांगितले. विदर्भात नाेंदणीकृत मत्स्यपालक, व्यावसायिकांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. लहान-माेठे तलाव व जलाशयाच्या गाेड्या पाण्यात मासेमारी करणारे, तसेच किरकाेळ व थाेक विक्रेत्यांचा यात समावेश आहे. सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही टाळेबंदी लागू केली. नियमांचे पालन व्हावे म्हणून स्थानिक प्रशासनाने बाजारही बंद केले आहेत. त्यामुळे मासेविक्री नगण्य झाली आहे. मार्च, एप्रिल व मे हा मासेमारीचा हंगाम असताे; मात्र गेल्यावर्षीप्रमाणे यावेळीही हा हंगाम वाया गेला. मासेमारी व विक्रीवर परिणाम झाल्याने तलाव, जलाशय ठेकेदार, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, मत्स्य कास्तकार, खासगी कंत्राटदार यांचे उत्पन्नही घटले आहे. अशा परिस्थितीत तलाव व जलाशयांवरील कंत्राट नूतनीकरणाची रक्कम भरणे मत्स्य व्यावसायिकांसाठी अडचणीचे झाले आहे. अशावेळी ठेका रकमेचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याचे परिपत्रक काढून शासनाने मासेमाऱ्यांना दिलासा दिला आहे. याशिवाय नवीन तलावांच्या लिलावाची अग्रीम रक्कम भरण्यासही मुदतवाढ देण्यात आली असून, परिस्थिती सुधारली नाही तर ही मुदत आणखी वाढविण्याचे संकेतही राज्य शासनाने दिल्याचे मांढरे यांनी सांगितले.
३० हजारांच्या वर तलावांवर मासेमारी
विदर्भातील जवळपास ३० हजारांच्या वर तलावांवर मासेमारी हाेते. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली या जिल्ह्यांतच २० हजार तलावांची संख्या आहे. शिवाय धरणावरील जलाशय व नदीपात्रातही मासेमारी केली जाते. बाजारबंद असल्याने मासे विक्री बंद आहे व विक्री बंद असल्याने मासेमारी थांबली आहे.