निर्यातक्षम संत्र्याला हवे शासकीय पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:00+5:302020-12-27T04:07:00+5:30
सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरी संत्र्याला जगात मागणी असली तरी, ताे सध्या केवळ पाच देशांमध्ये निर्यात ...

निर्यातक्षम संत्र्याला हवे शासकीय पाठबळ
सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरी संत्र्याला जगात मागणी असली तरी, ताे सध्या केवळ पाच देशांमध्ये निर्यात केला जाताे. चीन व युराेपियन राष्ट्रांमध्ये संत्र्यांची निर्यात करणे शक्य असतानाही त्या राष्ट्रांमध्ये संत्रा निर्यात हाेत नाही. निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविणे व मार्गदर्शन आवश्यक असून, उत्पादकता दर्जा वाढविण्यासाठी संत्र्यांच्या नवीन जाती विकसित करणे अत्यावश्यक आहे. यासाठी संत्र्याला ‘राजाश्रय’ हवा, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक व अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
नागपुरी संत्रा पूर्वी बांगलादेश व नेपाळमध्ये पाठविला जायचा. ताे २०१५ पासून या दाेन्ही देशांसह श्रीलंका, दुबई, बहरीन व कतारमध्ये निर्यात केला जाताे. ज्या देशात द्राक्षांची निर्यात हाेते, त्या देशांमध्ये संत्र्याच्या निर्यातीला वाव असून, ते सहज शक्य आहे, अशी माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. जगात संत्र्याच्या १० ते १५ जाती असून, विदर्भात मात्र कित्येक वर्षांपासून एकमेव जात वापरली जात आहे.
‘अराेमा’ (सुगंध), ‘इझी पिलिंग’ (साेलायला साेपा) व आंबट-गाेड चव ही नागपुरी संत्र्याची जमेची बाजू आहे. अधिक बिया व कमी उत्पादकता हे ‘ड्राॅ बॅक’ आहेत. नागपुरी संत्र्यातील गाेडवा ९ ते १० ब्रिक असून, परदेशातील संत्र्यात गाेडव्याचे प्रमाण १२ ते १८ ब्रिक आहे. परदेशात पल्प व ज्यूससाठी संत्र्याच्या वेगवेगळ्या जाती असून, ‘सीडलेस’ संत्रा टेबल फ्रूट म्हणून वापरला जाताे.
नागपुरी संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर सात टन आहे तर किन्नाेची २५ टन आणि स्पेनमधील संत्र्याची उत्पादकता प्रति हेक्टर ७० टन एवढी आहे. शासनाने या सर्व बाबी विचारात घेऊन निर्यातक्षम संत्र्याच्या उत्पादनासाठी संत्र्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित करणे, त्यावरील प्रक्रिया उद्याेग उभारणे, त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान पुरविणे अत्यावश्यक असल्याचे संत्रा उत्पादकांनी सांगितले.
...
‘प्राेटाेकाॅल लिस्ट’
निर्यात करण्यासाठी संत्र्याचा भारतासह इतर देशांच्या ‘प्राेटाेकाॅल लिस्ट’मध्ये समावेश असणे आवश्यक आहे. ही ‘प्राेटाेकाॅल लिस्ट’ संबंधित देशांचे वाणिज्यिक प्रतिनिधी तयार करतात. चीनमध्ये संत्र्याचे पाच ते सहा हजार काेटी रुपयांचे मार्केट आहे. परंतु, संत्रा दाेन्ही देशांच्या ‘प्राेटाेकाॅल लिस्ट’मध्ये नसल्याने ताे चीनमध्ये निर्यात करणे शक्य हाेत नाही. संत्र्याचा ‘प्राेटाेकाॅल लिस्ट’मध्ये समावेश करण्याची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरू झाली. काेराेना संक्रमणामुळे ही प्रक्रिया सध्या मंदावली आहे.
‘ॲपेडा’ व ‘ऑरेंज क्लस्टर‘
निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करून त्याच्या निर्यातीची जबाबदारी ‘ॲपेडा’ (द ॲग्रिकल्चर ॲण्ड प्राेसेस फूड प्राॅडक्ट एक्स्पाेर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी)वर साेपविली आहे. ‘ॲपेडा’ने निर्यातक्षम संत्र्याच्या उत्पादनासाठी ‘ऑरेंज क्लस्टर’ तयार करण्याच्या कामाला २०१९ पासून सुरुवात केली आहे. त्यांनी ‘सिट्रस नेट’ला मंजुरी दिली आहे. नागपुरी संत्र्याला ‘जीआय इंडिकेशन’ (भाैगाेलिक सांकेतांक) मिळाला असल्याने संत्रा निर्यातीचे दार उघडले गेले आहे.
...
शासनाने संत्रा उत्पादकांना याेग्यरीतीने मदत व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले असते, प्रक्रिया प्रकल्प सक्षमपणे चालविले असते, तर आज संत्रा उत्पादक सक्षम झाले असते. संत्र्यावरील संपूर्ण संशाधन स्थानिक शेतकऱ्यांनीच केले आहे. संत्र्याचा दर्जा व उत्पादकता वाढविण्यासाठी शासनाने मदत करायला हवी. कारण, या सर्व बाबी शासनाच्या अखत्यारीत येतात.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.