वाफेच्या दाबाने होतो स्फोट
By Admin | Updated: December 4, 2015 03:15 IST2015-12-04T03:15:29+5:302015-12-04T03:15:29+5:30
बुधवारी एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने १० वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले होते.

वाफेच्या दाबाने होतो स्फोट
तज्ज्ञांचे मत : स्टीलची टँक टाळावी
नागपूर : बुधवारी एका लग्नसमारंभात कॉफी मशीनचा स्फोट झाल्याने १० वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले होते. कॉफी मशीनचा इतका भीषण स्फोट कसा होऊ शकतो, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात मेकॅनिकल क्षेत्रातील काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांच्या मते कॉफी मशीन आणि कुकरचे तंत्रज्ञान सारखे आहे. कुकरमध्ये जसा वाफेचा दाब वाढतो, वाफ बाहेर निघण्यास अडथळा निर्माण होतो, तेव्हा कुकरचा स्फोट होतो. असाच काहीसा प्रकार कॉफी मशीनसंदर्भांत झाल्याने मशीनचा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले.
कॉफी मशीनमध्ये पाण्याची टँक असते. त्या टँकमध्ये २ हजार वॅटचे दोन कॉईल असतात. या कॉईलमुळे पाण्याचे तापमान वाढून त्याची वाफ होते. मशीनच्या एका भागाला नळी व दुसऱ्या भागाला सेफ्टी वॉल असतो. लग्नसमारंभात मशीन सतत सुरू राहते. टँकमध्ये वाफेचा दाब वाढतो. सेफ्टी वॉल खराब झाला असेल अथवा बंद करून ठेवला असेल तर वाफेला बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. कुकरचा प्रेशर वॉल खराब झाल्यास जसा स्फोट होतो, तसाच स्फोट कॉफी मशीनमध्येसुद्धा होऊ शकतो. टँकच्या आत निर्माण झालेल्या वाफेच्या दाबाला टँक सहन करू शकत नाही. त्यामुळे मशीनमध्ये जोरदार स्फोट होतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉफी मशीनची टँक कॉपरने बनविणे आवश्यक आहे. जेव्हा मशीनचे सर्व उपकरण काम करीत नसेल तेव्हाही कॉपर टँकचा स्फोट होत नाही, टँक केवळ लिकेज होते. मात्र स्टीलच्या टँकमध्ये प्रचंड स्फोट होतो. कॉपर महाग व स्टील स्वस्त असल्याने अशा घटना घडतात.(प्रतिनिधी)
मशीनमध्ये प्रेशर रिलिफ वॉल लावणे गरजेचे
कॉफी मशीनच्या टँकमध्ये नेहमी २ बाय ३ प्रमाणात पाणी असावे. हे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचे लेव्हल सेन्सर लावणे गरजेचे आहे. कॉफी मशीनमध्ये प्रेशर रिलिफ वॉल लावणे गरजेचे आहे. प्रेशर स्वीच काम करीत नसल्यास हा वॉल कुकरच्या वॉलसारखा काम करतो. मशीनमध्ये हा वॉल नसेल अथवा काम करीत नसेल तर टँकमध्ये वाफेचा दाब वाढल्याने टँक फुटू शकते.
-तपन मिस्त्री, कॉफी मशीनचे तन्ज्ञ.