मोठ्या विमानांसाठी ‘पार्किंग बे’चा विस्तार
By Admin | Updated: April 2, 2017 02:34 IST2017-04-02T02:34:53+5:302017-04-02T02:34:53+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या आकाराच्या विमानांसाठी पार्किंग बे आणि अॅप्रॉनचा विस्तार करण्यात येणार आहे.

मोठ्या विमानांसाठी ‘पार्किंग बे’चा विस्तार
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या आकाराच्या विमानांसाठी पार्किंग बे आणि अॅप्रॉनचा विस्तार करण्यात येणार आहे. याशिवाय विमानतळाची सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी गृह मंत्रालयाची सुरक्षा मंजुरी मिळाली आहे.(प्रतिनिधी)
आधुनिकीकरणासाठी पाच कंपन्या पात्र
मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाची (एएआय) संयुक्त कंपनी आहे. यात एमएडीसी आणि एएआयचा अनुक्रमे ५१ आणि ४९ टक्के वाटा आहे. विमानतळाची सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी धोरणात्मक भागीदाराची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयएलने मे-२०१६ मध्ये रिक्वेस्ट फॉर क्वॉलिफिकेशन (आरएफक्यू) कागदपत्रे प्रकाशित केली होती. या प्रक्रियेत जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स लि., पीएनसी इन्फ्राटेक लि., टाटा रिअॅलिटी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., जीएमआर एअरपोर्ट लि., एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. या सहा कंपन्यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये कागदपत्रे सादर केली. प्रारंभिक छाननीत जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स, पीएनसी इन्फ्राटेक, टाटा रिअॅलिटी, जीएमआर एअरपोर्ट आणि एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्या पात्र ठरल्या. त्यानंतर या कंपन्यांची कागदपत्रे सुरक्षा परवान्यासाठी गृह मंत्रालयाकडे सादर करण्यात आली.
पीपीपी धर्तीवर विकास
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बोर्ड बैठक ३१ मार्चला मुंबईत मुख्यमंत्री आणि एमएडीसी संचालक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पाचही कंपन्यांच्या सुरक्षा परवान्याला गृह मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी दिली. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, आॅपरेट आणि ट्रान्सफर (डीबीएफओटी) या मॉडेलनुसार पीपीपी धर्तीवर विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. विमानतळावर बी-७७७ आणि बी-७४७ यासारख्या मोठ्या विमानांच्या पार्किंगसाठी विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी बैठकीत एमआयएलच्या सात कोटींच्या मागणीला मंजुरी देण्यात आली.
विश्वास पाटील यांनी सांगितले की, नागपूर विमानतळावर गेल्या दोन वर्षांत प्रवासी संख्येत १८ ते २० टक्के वाढ झाली आहे. २०१५-१६ आर्थिक वर्षांत एकूण प्रवासी संख्येत दीड कोटींचा आकडा पार केला आहे. या उपलब्धीमुळे विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने (एईआरए) आॅक्टोबर २०१६ मध्ये नागपूर विमानतळाला देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये मुख्य विमानतळाचा दर्जा दिला. भविष्यात कार्गोची मागणी पाहता अतिरिक्त कार्गो जागा तसेच फळे आणि भाज्यांच्या निर्यातीसाठी कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सीमा शुल्क विभागाच्या मंजुरीनंतर हा विभाग कार्यान्वित होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.