नागपूरचा विस्तार बाकाबार्इंमुळे झाला
By Admin | Updated: April 17, 2016 03:14 IST2016-04-17T03:14:35+5:302016-04-17T03:14:35+5:30
इतिहासकार अनेकदा संपूर्ण इतिहासाचे तथ्य न तपासता इतिहासाची मांडणी करीत असतात. पण त्यामुळे इतिहासात उणिवा निर्माण होतात.

नागपूरचा विस्तार बाकाबार्इंमुळे झाला
मुधोजीराजे भोसले : ‘महाराणी बाकाबाई’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर : इतिहासकार अनेकदा संपूर्ण इतिहासाचे तथ्य न तपासता इतिहासाची मांडणी करीत असतात. पण त्यामुळे इतिहासात उणिवा निर्माण होतात. काही इतिहास लेखनावर मी अनेकदा आक्षेप घेतला आहे. डॉ. भा. रा. अंधारे यांनी आतापर्यंत अनेक व्याख्याने आणि लेखन केले पण त्यांच्यावर आक्षेप घेण्याची वेळ कधीच आली नाही. या पुस्तकातूनही त्यांनी भोसले घराण्याचा संपूर्ण इतिहास अतिशय अभ्यासपूर्णतेने मांडला आहे. बाकाबार्इंमुळे नागपूरचा विस्तार झाला पण हे तथ्य आतापर्यंत समोर आले नाही. आज नागपूरचे जे विस्तारित स्वरूप दिसते आहे त्यात बाकाबार्इंचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मत राजे मुधोजी भोसले यांनी केले.
द्वितीय रघुजींची तृतीय पत्नी बाकाबाई यांच्या चरित्राचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले. इतिहास संशोधक डॉ. भा. रा. अंधारे यांनी ‘श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेब भोसले’ या पुस्तकातून नागपूरच्या इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन भरतनगर येथील दत्त मंदिरात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, डॉ. श्रीकांत सोनटक्के, डॉ. गोविंद तिरमनवार, डॉ. भा. रा. अंधारे उपस्थित होते. मुधोजीराजे भोसले म्हणाले, राजघराण्यातील लोकांना नंतर विसरले जाते. आपण झाशीच्या राणीला ओळखतो पण भोसले घराण्याच्या कर्तृत्ववान स्त्री असलेल्या बाकाबार्इंना मात्र विसरतो. या पुस्तकाने ही उणीव दूर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लक्ष्मणराव जोशी म्हणाले, समाजात काम करणाऱ्यांना आपण उचलून धरतो पण काही लोक कायम उपेक्षित राहतात. डॉ. अंधारे यांचे इतिहास संशोधन पुरंदरेंच्या तोडीचे आणि नागपूर-विदर्भासाठी अत्यंत मोलाचे आहे. विदर्भाच्या इतिहासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांचे संशोधन महत्त्वाचे असूनही त्यांना म्हणावे त्या प्रमाणात वैदर्भीयांनी उचलून धरले नाही. डॉ. अंधारे यांनी मात्र त्यांचे कार्य आणि संशोधन अव्याहतपणे सुरू ठेवले. इतिहासाचे संशोधन करणे हे क्लिष्ट काम आहे. त्यासाठी फार संयम लागतो. खरे बोलता येत नाही आणि खोटे सांगता येत नाही. अनेकदा दस्तावेज मिळत नाहीत. पण यातून मार्ग काढून त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. राजेशाही संपली आणि लोकशाही आली. त्यात राजांचे अधिकार, पदेही संपुष्टात आलीत. पण भोसले घराण्याने मोठ्या मनाने लोकशाही मान्य केली.
श्रीपाद अपराजित म्हणाले, इतिहासाबद्दल तोलून मापून बोलावे लागते. प्रत्येक घटनांची सत्यता तपासून त्यांचे संदर्भ लावणे हे कठीण काम आहे. या पुस्तकात बाकाबार्इंच्या नावाने मारबत काढण्यात आली, असा उल्लेख आहे. पोळ्याच्या दिवशी बाकाबार्इंचे निधन झाले, पण त्यानंतर ४० वर्षांनी मारबत काढण्यात आली. बाकाबार्इंना आजची पिढी ओळखतही नाही. आताच्या पिढीला कारगील युद्ध माहीत नाही त्यांना बाकाबाई कशी माहीत असणार. पण या पुस्तकाने तरुणाईला इतिहासाचे वेड लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पुस्तकाच्या भूमिकेबद्दल सांगताना याप्रसंगी डॉ. गोविंद तिरमनवार संपादित ‘डॉ. भा.रा. अंधारे यांचे प्रस्तावना लेखन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. गोविंद तिरमनवार आणि डॉ. श्रीकांत सोनटक्के यांनीही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दीप्ती अंधारे यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजू मिश्रा यांचा प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्कार लाभल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सर्वच अतिथींनी याप्रसंगी राजू मिश्रा यांच्या कार्याचा गौरव करून भविष्यातील त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. (प्रतिनिधी)