विद्यमान नगरसेवकांत होणार टक्कर
By Admin | Updated: October 13, 2016 03:47 IST2016-10-13T03:47:43+5:302016-10-13T03:47:43+5:30
नवीन प्रभाग रचनेत महापालिकेतील बहुसंख्य दिग्गजांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे.

विद्यमान नगरसेवकांत होणार टक्कर
एकाच प्रभागात समावेश : निवडणुक ीसाठी मोर्चेबांधणी
नागपूर : नवीन प्रभाग रचनेत महापालिकेतील बहुसंख्य दिग्गजांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी आहे. परंतु काही सदस्यांच्या प्रभागाचे त्रिभाजन झाले आहे. काही प्रभागात सलग जुने प्रभाग जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागात विद्यमान नगरसेवक आमने-सामने उभे ठाकणार असल्याने त्यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.
काँग्रेसचे नगरसेवक अरुण डवरे व नासुप्रचे विश्वस्त भाजप नगरसेवक भूषण शिंगणे आता प्रभाग ११ मधून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये एक जागा ओबीसी आहे तर प्रभाग क्रमाक ११ मध्ये एक जागा सर्वसाधारण आहे. भूषण शिंगणे व अरुण डवरे यांना हे दोन्ही प्रभाग लढण्यासाठी सोयीचे आहेत. मात्र, दोघांचाही आग्रह प्रभाग ११ साठी आहे. मागणीनुसार त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास या प्रभागात डवरे-शिंगणे यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे.
नगरसेवक किशोर गजभिये यांचा विश्वकर्मानगर हा प्रभाग नवीन प्रभाग रचनेत तीन वेगवेगळ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे. यात प्रभाग क्रमांक १७ व ३२ आणि प्रभाग क्रमांक ३३चा समावेश आहे. परंतु गजभिये यांना प्रभाग ३३ सोयीचा असल्याने त्यांनी येथूनच लढण्याची तयारी चालविली आहे. या प्रभागात पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास नगरसेवक वासुदेव ढोके यांच्याशी त्यांची लढत होऊ शकते. (प्रतिनिधी)