ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात साकारलेल्या मनमोहक कलाकृतींचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 20:42 IST2019-10-05T20:37:11+5:302019-10-05T20:42:36+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात साकारलेल्या मनमोहक कलाकृतींचे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी करण्यात आले.
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ताडोबा येथील इरई सफारी रिट्रीटमध्ये आयोजित ‘जवाहरलाल दर्डा स्मृती आर्ट कॅम्प २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार विनोश शर्मा यांच्या संयोजनात या कॅम्पमध्ये मुंबई येथील आनंद पाचाळ, ब्रिंदा मिलर, दीपक शिंदे, कहीनी अर्ते-मर्चंट, प्राजक्ता पालव, संजीव सोनपिंपरे, सुहास बाहुलकर, सूर्यकांत लोखंडे, स्वीता राय, हैद्राबाद येथील लक्ष्मण ऐले, दिल्ली येथील मनीष पुष्कळे, शोभा ब्रुटा, तेजिंदर कांडा, विजेंदर शर्मा, पुणे येथील एम. नारायण, वडोदरा येथील रिनी धुमाळ, गुवाहाटी येथील वाहिदा अहमद, पटना येथील युसुफ हुसैन आणि पॅरिस येथून सुजाता बजाज असे एकूण २० प्रथितयश चित्रकार सहभागी झाले होते. विदर्भात अशा प्रकारच्या कॅम्पचे आयोजन प्रथमच करण्यात आले असल्याने, हे शिबिर अनेकार्थाने कौतुकास्पद ठरले. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या चित्रकारांनी गेले पाच दिवस ताडोबाच्या निसर्गरम्य वातावरणात स्वत:च्या अभिव्यक्तीला चालना देत सुरेख चित्रकृती साकारली. त्या चित्रकृतींचे प्रदर्शन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये लावण्यात आले आहे. शनिवारी या प्रदर्शनाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी, कॅम्पमध्ये सहभागी सर्व कलावंत व कॅम्पमध्ये कलावंतांच्या मनोवृत्तीचे निरीक्षण करणाऱ्या कला समीक्षक साधना बाहुलकर उपस्थित होते. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे पर्यवेक्षक अमित डोनाडे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संचालन मतीन खान यांनी केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे चित्रप्रदर्शन ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजतापर्यंत बघता येणार आहे.
आम्हा सगळ्यांना म्युझियमची उत्सुकता - सुहास बाहुलकर
ताडोबा म्हणून निसर्गाचा अनुपम असा सोहळाच आहे. अशा रम्य वातावरणात सर्व चित्रकारांनी एकसाथ आपल्या कलाकृतींना आकार दिल्याचा आनंद आहे. आम्ही चित्र साकारले आणि आता हे चित्र दर्डा कुटुंबीयांकडून साकारल्या जाणाऱ्या कन्टेम्पररी म्युझिममध्ये कधी लागतील, याची उत्सुकता लागली असल्याचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बाहुलकर यांनी यावेळी सांगितले. यासोबतच, शिबिरात सर्व कलावंतांनी अशा शिबिराबद्दल जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी आणि लोकमत माध्यम समूहाचे आभार मानले.