युग चांडकच्या मारेकऱ्यांना फाशी
By Admin | Updated: December 25, 2016 03:06 IST2016-12-25T03:06:56+5:302016-12-25T03:06:56+5:30
गांधीबागेतील आठ वर्षीय शाळकरी मुलगा युग मुकेश चांडक याच्या दोन मारेकऱ्यांना झालेली फाशीची शिक्षा.

युग चांडकच्या मारेकऱ्यांना फाशी
नागपूर : गांधीबागेतील आठ वर्षीय शाळकरी मुलगा युग मुकेश चांडक याच्या दोन मारेकऱ्यांना झालेली फाशीची शिक्षा. बालिकांवर विनयभंग आणि बलात्कारासारखे घृणित कृत्य करणाऱ्यांना शिक्षा, राज्यात गाजत असलेल्या कोट्यवधीच्या सिंचन घोटाळ्यात न्यायालयात दाखल झालेले सहा आरोपींवरील पहिले दोषारोपपत्र आणि १०८ आरोपींचा समावेश असलेल्या मनपा साहित्य क्रीडा घोटाळ्यात निश्चित करण्यात आलेले आरोप, अशा ठळक प्रकरणांसह अनेक प्रकरणांनी नागपूरचे जिल्हा व सत्र न्यायालय २०१६ मध्ये गाजले.
युगच्या मारेकऱ्यांना फाशी
लकडगंज गुरुवंदना हाऊसिंग सोसायटी येथून १ सप्टेंबर २०१४ रोजी डॉ. मुकेश चांडक यांचा आठ वर्षीय शाळकरी मुलगा युग याचे १० कोटींच्या खंडणीसाठी गुन्हेगारी कट रचून अपहरण केल्यानंतर त्याचा खून करून पाटणसावंगी-लोणखैरी भागातील नाल्यात मृतदेह पुरणाऱ्या कळमना वांजरी ले-आऊट येथील राजेश धन्नालाल दवारे आणि नारा रोड प्रीती ले-आऊट येथील अरविंद अभिलाष सिंग या दोघांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
शेतकऱ्यांच्या खुन्यांना जन्मठेप
कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवंढी गावात झालेल्या नीलेश नत्थूजी वाघमारे (३६) या शेतकऱ्याच्या खुनातील संजय हिरामण येंडे (४५), सुधीर पांडुरंग पौनीकर (४५) आणि ज्ञानेश्वर केशवराव गेचोडे (४२) या तीन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दारूचे तीन पव्वे चोरल्याचा आळ घेऊन ९ जुलै २०१४ रोजी हा खून करण्यात आला होता. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी (काळे) येथे सल्फेट खताच्या उधारीच्या वसुलीतून बंडू ताराचंद ढोबळे (३८) या शेतकऱ्याचा फौजदारी कट रचून ४ जुलै २०१४ रोजी निर्घृणपणे खून करणाऱ्या मुकेश ऊर्फ मंगेश मधुकर रोहणकर, राजहंस बाबूराव चौधरी आणि संदीप धनराज चौधरी यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कुख्यात खंडेश्वरच्या खुन्यांना जन्मठेप
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंगाबाई टाकळी येथील कुख्यात गुन्हेगार अमित खंडेश्वर याच्या खुनात अरुण किसन गेडाम आणि अभिजित ऊर्फ मोंटू अरुण गेडाम यांना जन्मठेप, तिघे निर्दोष, खुनाची घटना ३ नोव्हेंबर २०१३ रोजी ताजुद्दीनबाबा दर्ग्यासमोर घडली होती.
हेड कॉन्स्टेबलवर हल्ला : कारावास
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रसंत तुकडोजी बँकेसमोर २४ आॅगस्ट २०१४ च्या पहाटे हेड कॉन्स्टेबल सुभाष जंगले यांच्यावर कुकरीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करणाऱ्या वांजरी ले-आऊट म्हाडा कॉलनी येथील शेख वसीम ऊर्फ सोनू शेख अहमद अन्सारी याला दहा वर्षे कारावास, दोघे निर्दोष.
हेड कॉन्स्टेबलला शिक्षा
मुलगा आणि मुलगी घरातून पळून गेल्याने पिपळा फाटा भागातील साईविहार कॉलनी येथील रहिवासी ज्ञानेश्वर चुटे याला सतत हिणवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने न्यायालयाने हेड कॉन्स्टेबल भागवत तुकाराम भेंडारकर याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. १४ एप्रिल २०१४ रोजी चुटे यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती.