नवीन कंपन्यांमुळे मिहानमध्ये उत्साह
By Admin | Updated: August 17, 2016 02:18 IST2016-08-17T02:18:05+5:302016-08-17T02:18:05+5:30
गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील कंपन्या मिहान-सेझमध्ये उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

नवीन कंपन्यांमुळे मिहानमध्ये उत्साह
‘पतंजली’ ने भरले ६.५० कोटी : दुबईतील परफ्युम कंपनीने घेतली जागा
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देश-विदेशातील कंपन्या मिहान-सेझमध्ये उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. फूड पार्कमध्ये ‘पतंजली’ला २३० एकर जागा मिळाल्यानंतर पुन्हा तीन नवीन कंपन्यांनी जागा खरेदी केली आहे. या उत्पादक कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असून त्यामुळे मिहानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मिहान-सेझमध्ये २०१६ मध्ये छोट्यामोठ्या १२ कंपन्यांनी जागा घेतली आहे. तर मध्यवर्ती इमारतीत आठ आयटी कंपन्या कार्यान्वित झाल्या आहेत.
पुन्हा काही आयटी कंपन्यांनी छोट्या जागेची मागणी केली आहे. याशिवाय जुलैमध्ये एसईझेडबाहेर एनडीएसपी स्पाईसेस आणि एसवायएस लॉजिस्टिकने प्रत्येकी एक एकर जागा खरेदी केली आहे. याशिवाय दुबई येथील नामांकित परफ्यूम उत्पादक कंपनीने एसईझेड या निर्यातीत क्षेत्रात २.५ एकर जागा खरेदी केली आहे.
वर्षभरात उत्पादन सुरू करण्याचा या कंपनीचा दावा आहे. याशिवाय देशातील नामांकित कंपन्यांनी एसईझेडमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी जागेची विचारण केली आहे. काही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पतंजलीची जागा ६०.३६ कोटींची
तिसऱ्या निविदेत पतजंलीला २६.२५ लाख रुपये एकर दराने एसईझेडबाहेरील फूड पार्कमध्ये २३० एकर अविकसित जागा मिळाली आहे. या जागेची एकूण किंमत ६०.३६ कोटी रुपये आहे. कंपनीला जागा विकसित करून त्यावर उद्योग सुरू करावा लागणार आहे. कंपनीने जागेसाठी प्रारंभी ६.५० कोटी रुपये भरले आहे. पूर्ण पैसे भरल्यानंतर कंपनीला जागेचा ताबा देण्यात येणार आहे. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. अधिग्रहणानंतर जागेच्या विकासासाठी जवळपास एक वर्ष लागणार आहे. त्यानंतर उद्योगाची उभारणी आणि उत्पादनासाठी पुन्हा एक वर्ष लागेल. अर्थात प्रत्यक्षात उत्पादन निर्मितीसाठी दोन वर्षे लागतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पण या उद्योगाच्या येण्याने मिहानमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एवढी मोठी जागा घेऊन उत्पादनांची निर्मिती करणारी पतंजली मिहानमधील पहिलीच कंपनी आहे.