प्रवाशांच्या खिशावर जादाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:09+5:302021-01-03T04:12:09+5:30
३६५ पैकी १७२ बसच रस्त्यावर : एप्रिल महिन्यात धावणार पूर्ण क्षमतेने आपली बस लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

प्रवाशांच्या खिशावर जादाचा भार
३६५ पैकी १७२ बसच रस्त्यावर : एप्रिल महिन्यात धावणार पूर्ण क्षमतेने आपली बस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे सात महिने महापालिकेची आपली बस बंद होती. अन्लॉकनंतर सुरुवातीला ४० बस धावण्याला सुरुवात झाली. त्यानंतर ९० व पुढे ही संख्या १७२ पर्यंत वाढविण्यात आली. सध्या दररोज ४० ते ५० हजार प्रवासी प्रवास करतात. सर्व ३६५ बस रस्त्यांवर धावत नसल्याने शहरातील काही भागांतील नागरिकांना रोज ऑटो, टॅक्सी वा अन्य साधनांचा वापर करावा लागत असल्याने त्यांना जादा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
‘आपली बस’ दिवाळीनंतर पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र सध्या १७२ बस धावत आहेत. वास्तविक लॉकडाऊनपूर्वी शहरात ३६५ बस धावत होत्या. यातून दररोज १ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करीत होते. यातून महापालिकेच्या तिजोरीत २० ते २२ लाखांचा महसूल जमा होत होता. मात्र सध्या सहा ते सात लाखांचा महसूल जमा होत आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता होणारा तोटा टाळण्यासाठी प्रशासन एप्रिलपर्यंत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या विचारात नाही; परंतु तोटा कमी करण्याच्या प्रयत्नात शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
...
७ कोटींचा तोटा ३ कोटींवर
बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू असल्यास महापालिकेला दर महिन्याला १३ ते १३.५० कोटींचा खर्च करावा लागतो; तर तिकिटातून महिन्याला ६ ते ६.५० कोटी मिळतात. म्हणजेच सात कोटींचा तोटा सहन करावा लागतो. सध्या १७२ बस सुरू असल्याने महापालिकेचा तोटा ३ ते ३.५० कोटींवर आला आहे.
...
मेट्रोमुळे प्रवासी घटले
हिंगणा मार्गावर मेट्रोमुळे ‘आपली बस’च्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तसेच पारडी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर या मार्गावर बसप्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. मात्र फिडर सेवेतून काही प्रमाणात महसूल येईल, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
....
कोरोनाचे संकट संपताच पूर्ण क्षमतेने बससेवा
कोरोनाचे संकट अजूनही गेलेले नाही. सध्या १७२ बसेस धावत आहेत. नागरिकांच्या मनातील भीती अजून गेलेली नाही. यामुळे अपेक्षित प्रवासी नाहीत. कोरोनाचे संकट दूर होताच पूर्ण क्षमतेने शहर बससेवा सुरू केली जाईल. तूर्त ३१ जानेवारीपर्यंत बससंख्या वाढण्याची शक्यता नाही.
- रवींद्र पागे, प्रशासकीय अधिकारी, परिवहन विभाग, नेागपूर महापालिका
....