लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पक्षफुटीनंतर खासदार, आमदार, पदाधिकारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले. आता उद्धवसेनेचे फक्त दोन आमदार सोडले, तर उर्वरित सर्व शिंदेंच्या संपर्कात असून, दसरा मेळाव्यानंतर आम्ही ठाकरेंना दणका देणार आहोत, असा दावा करीत शिंदे सेनेचे आ. कृपाल तुमाने यांनी खळबळ उडवून दिली आहे.
मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना आ. तुमाने म्हणाले. मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत. खा. संजय राऊत यांच्या भूमिकेवर अनेक आमदार नाराज आहेत. ते सगळे राऊतांना कंटाळले आहेत. राऊतांमुळे उबाठाचा सत्यानाश झाला आहे. शिवसेनेसाठी दसऱ्याचा दिवस महत्त्वाचा असतो. याच दिवशी पक्षाशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा झाल्या आहेत.
यावेळीही दसऱ्यानंतर शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असे तुमाने म्हणाले. तुमाने यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उद्धव सेनेला पुन्हा खिंडार पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकारचा आमदारांचा ओघ हा राजकीय समीकरणं बदलणारा ठरू शकतो. आधीच अनेकांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. अशात निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी साथ सोडली तर हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असेल.
तुमानेंना जिल्ह्यात तरी कुणी विचारते का : सतीश हरडे
राज्यभरातील उद्धव सेनेचे आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा करणारे आ. कृपाल तुमाने यांना नागपूर जिल्ह्यात तरी कुणी विचारतं का, ते शिंदेंसोबत गेले तेव्हा त्यांच्या मागे चार कार्यकर्ते तरी गेले का, असा चिमटा उद्धव सेनेचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी काढला. तुमाने यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने दोनदा खासदार केले. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आयुष्यभर ऋणी राहायला हवे होते. मात्र, ते गद्दार झाले. आता उलटसुलट वक्तव्ये करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही हरडे यांनी केली.