आधी पॅकेज नंतरच खोदकाम

By Admin | Updated: April 20, 2017 02:43 IST2017-04-20T02:43:40+5:302017-04-20T02:43:40+5:30

साहोली, सिंगोरी, डोरली व हिंगणा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेकोलिने ताब्यात घेऊनदेखील अद्याप शेतकऱ्यांना नोकरी

Excavation only after the first package | आधी पॅकेज नंतरच खोदकाम

आधी पॅकेज नंतरच खोदकाम

साहोलीवासीयांनी दर्शविला विरोध : वेकोलिच्या मनमानी कारभारावर गावकऱ्यांमध्ये संताप
पारशिवनी : साहोली, सिंगोरी, डोरली व हिंगणा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेकोलिने ताब्यात घेऊनदेखील अद्याप शेतकऱ्यांना नोकरी वा मोबदला दिलेला नाही. दरम्यान, क्षेत्राच्या आमदारांच्या उपस्थितीत काम सुरू करण्याचा वेकोलिचा डाव साहोली येथील ग्रामस्थांनी मंगळवारी उधळून लावला. वेकोलि प्रशासनाच्या मनमानी कारभारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आधी शेतीचे संपूर्ण पॅकेज द्या, नंतरच शेतात खोदकाम करा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी वेकोलि अधिकाऱ्यांना ठणकावले.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी साहोली परिसरातील शेतजमिनीवर खोदकाम करण्याचे ठरविले. त्यानुसार क्षेत्राचे आ. डी. एम. रेड्डी, उपविभागीय अधिकारी राम जोशी, तहसीलदार बाळासाहेब तेढे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब गायगोले, पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत, प्रवीण सोनोने व वेकोलिचे अधिकारी प्रस्तावित शेतजमिनीवर दाखल झाले. आमदारांनी वेकोलि अधिकाऱ्यांना खोदकाम करण्यासाठी मशीन आणण्यास आदेश दिले.
मशीन प्रस्तावित शेतजमिनीच्या दिशेने येताना दिसताच शेतकऱ्यांनी वेकोलिविरुद्ध नारेबाजी केली. आधी संपूर्ण मोबदला द्या, नंतरच खोदकाम करा, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी खोदकामाला विरोध दर्शविला. काही जण मशीन अडविण्यासाठी धावले. यावेळी १५० शेतकरी उपस्थित होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे ध्यानात येताच आ. डी. एम. रेड्डी यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलाविले.
या चर्चेमध्ये शेतकऱ्यांनी आधी ११० लोकांना नोकरी देण्यात यावी, ८७ शेतकऱ्यांना पूर्ण आर्थिक पॅकेज देण्यात यावे, ओलित व कोरडवाहू शेतजमीन हा वाद सोडविण्यात यावा, सुनील सहारे, पांडुरंग कानफाडे, अतुल फुलझेले या शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, ज्या १८ शेतकऱ्यांना अल्प मोबदला मिळाला आहे, त्यांना नवीन दराने पूर्ण मोबदला देण्यात यावा आदी अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी आमदार व अधिकाऱ्यांसमोर मांडले. चर्चेअंती आधी शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करू, त्यानंतर खोदकाम केले जाईल, असे वेकोलि अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)

तोपर्यंत एक खड्डाही खोदू देणार नाही
वेकोलिसंदर्भात आमची बाजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमक्ष मांडली जाईल आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेतात एक खड्डादेखील खोदू देणार नाही, असा इशारा सुनील सहारे, पांडुरंग कानफाडे, नीलेश हेलोंडे, पंकज पिंपळशेंडे, मधुकर रांगनकर, योगराज उकुंडे, श्रीकांत चिकनकर, कमलाकर रांगनकर, बाळकृष्ण कुंभारे, विशाल ढोके आदींसह गावकऱ्यांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधींना कुणाचे हित साधायचे?
वेकोलि प्रशासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळण्यापूर्वीच शेतजमिनीवर खोदकाम करण्याचे प्रयत्न चालविले. यामध्ये आ. डी. एम. रेड्डी यांनी मध्यस्थी करीत ग्रामस्थांसमक्ष खोदकाम करण्याचे निर्देश दिले. यातून आमदारांना वेकोलि अधिकाऱ्यांचे हित साधायचे असल्याचेच दिसून आले. त्यामुळे लोकप्रतिनिधी नेमके कुणाचे हित साधताहेत, असा संतप्त सवाल साहोली- सिंगोरी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील सहारे यांनी उपस्थित केला.

Web Title: Excavation only after the first package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.