परीक्षांत ‘मासकॉपी’ जोरात
By Admin | Updated: April 21, 2017 02:58 IST2017-04-21T02:58:24+5:302017-04-21T02:58:24+5:30
उन्हाळी परीक्षांमध्ये कॉपी होत नसल्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला आहे.

परीक्षांत ‘मासकॉपी’ जोरात
नागपूर विद्यापीठ : भरारी पथक नावापुरतेच, स्वच्छतागृहांत ‘कॉपी’ची विल्हेवाट
आशिष दुबे नागपूर
उन्हाळी परीक्षांमध्ये कॉपी होत नसल्याचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठाच्या अनेक परीक्षा केंद्रांवर सर्रासपणे ‘मासकॉपी’ सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर नियुक्त
अधिकाऱ्यांच्याच मदतीने ‘कॉपी’ची विल्हेवाट लावण्यात येत आहे. अनेक परीक्षा केंद्रांचे परिसर व स्वच्छतागृहात ‘कॉपी’च्या चिठ्ठ्या दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘कॉपी’ची प्रकरणे नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेले भरारी पथक अक्षरश: आराम करीत आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, भरारी पथक केवळ औपचारिकता म्हणून परीक्षा केंद्रांवर जातात व लगेच परततात. याचा फायदा केंद्रांवरील अधिकारी घेत आहे. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरांमध्ये जास्त प्रमाणात ‘कॉपी’ होत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाजवळील महाविद्यालयांमध्ये देखील हेच चित्र आहे. भरारी पथकच येत नसल्यामुळे विद्यार्थी ‘नोट्स’ व पुस्तकांच्या मदतीने पेपर लिहित आहेत. ‘लोकमत’ने एका महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्राची तपासणी केली असता प्रत्येक वर्गात परीक्षार्थी उघडपणे ‘कॉपी’ करीत असल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना थांबविण्याऐवजी पर्यवेक्षक वर्गाबाहेर दिसून आले. यासंदर्भात परीक्षा विभागाचे अधिकारी व नागपूर शहरात भरारी पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची ‘कॉपी’ होत नसल्याचा दावा केला. नेमक्या किती विद्यार्थ्यांवर कारवाई झाली याबाबत देखील अधिकारी मौन साधून आहेत.
केवळ पाच भरारी पथके
उन्हाळी परीक्षांसाठी नागपूर शहर व विभागात १९६ परीक्षा केंद्रे आहेत. येथे हजारो परीक्षार्थी असले तरी एकूण भरारी पथके केवळ पाचच आहेत. एका पथकात पाच जणांचा समावेश असतो.
परीक्षा संचालक म्हणतात, कारवाई होतेय
यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘कॉपी’च्या प्रकरणांमध्ये घट झाल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक केंद्रांवर ‘कॉपी’बहाद्दरांवर कारवाई झाली आहे. भरारी पथके थेट परीक्षा शिस्तपालन समितीकडे अहवाल सादर करतात. त्यामुळे किती जणांवर कारवाई करण्यात आली, हे सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.