परीक्षा तोंडावर, पुस्तके पार्सल विभागात
By Admin | Updated: December 1, 2015 07:11 IST2015-12-01T07:11:15+5:302015-12-01T07:11:15+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर असताना, विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळणारी पुस्तके एसटी

परीक्षा तोंडावर, पुस्तके पार्सल विभागात
मंगेश व्यवहारे ल्ल नागपूर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा तोंडावर असताना, विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळणारी पुस्तके एसटी महामंडळाच्या पार्सल विभागात पडलेली आहेत. पुस्तके पार्सल विभागात पडली असल्याची माहिती महाविद्यालयांना असूनसुद्धा महाविद्यालयाच्या बोर्डवर पुस्तके घरपोच येतील, पुस्तकासंदर्भात विचारणा करू नये अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. परीक्षा लवकरच असल्याने पुस्तकासाठी विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे.
एसटी महामंडळाच्या पार्सल विभागात जवळपास १५ ते २० हजार बीए, बीकॉम विषयाची पुस्तके पडलेली आहेत. काही विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाल्याने, विद्यार्थ्यांनी पार्सल विभागाशी संपर्क साधला. पुस्तकासाठी त्यांना आधार कार्ड व विद्यापीठाकडून पाठविलेला एसएमएस आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना एसएमएस मिळाला नसल्याने, पार्सल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुस्तक देण्यास असमर्थता दर्शविली. विद्यार्थ्यांनी पुस्तके मिळावी म्हणून संबंधित महाविद्यालयात संपर्क साधला असता, पुस्तकासंदर्भात विचारणा करू नका अशा सूचना महाविद्यालयात लावून ठेवल्या. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने एसएमएस केला, त्या विद्यार्थ्यांनाही पुस्तके मिळविण्यासाठी त्रास होत आहे. पार्सल कार्यालयातील कर्मचारी हा विद्यापीठाशी संबंधित नसल्याने विद्यार्थ्यांना स्वत:च पुस्तके शोधावी लागत आहे.
यामुळे पुस्तके हरविण्याचीही शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठाचा हा भोंगळ कारभार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. यासंदर्भात महाविद्यालयात संपर्क साधला असता, यापूर्वी पुस्तके विद्यापीठातर्फे केंद्रावर पोहचविली जायची. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके उपलब्ध होईल, अशा सूचना विद्यापीठाकडून आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून आम्हाला पुस्तकांसंदर्भात विचारणा होत आहे, आम्ही त्यांना घरपोच पुस्तके उपलब्ध होईल, असे सांगत आहोत. दोन महिन्यापासून ही पुस्तके पार्सल विभागात पडलेली आहे. विद्यार्थ्यांची पुस्तकासाठी ओरड होत असताना, त्यांना पुस्तके का मिळत नाही, याची साधी दखलही विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली नाही. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पुस्तके येथे पडलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके एसटीच्या पार्सल विभागात पडलेली असल्याची माहिती मिळाली, त्यांनी पार्सल विभागातून पुस्तके मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु एसएमएस आणि आधारकार्डशिवाय पुस्तके देण्यास असमर्थता दर्शविल्याने, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
विद्यापीठाचा कुरिअर कंपनीशी करार
४यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील भांडार अधीक्षक थोरात यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, विद्यापीठाने अंकल पार्सल या कंपनीशी करार केला आहे. करारानुसार पार्सल कंपनीने विद्यार्थ्यांना पुस्तके घरपोच उपलब्ध करून द्यायची आहे. आम्ही कुरिअर कंपनीच्या संपर्कात आहोत, लवकरच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके मिळतील.