माजी सैनिकाने केला गोळीबार
By Admin | Updated: March 15, 2017 02:33 IST2017-03-15T02:33:20+5:302017-03-15T02:33:20+5:30
होळीची राख साफ करण्यावरून झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केला.

माजी सैनिकाने केला गोळीबार
धुळवडीच्या दिवशी वाद : मानकापुरात तणाव
नागपूर : होळीची राख साफ करण्यावरून झालेल्या वादात एकाने हवेत गोळीबार केला. सोमवारी रात्री ६.४५ वाजता ही घटना घडली. यामुळे मानकापुरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
श्रीनिवास कामेश्वर सिंग (वय ४६) हा मानकापूरच्या विठ्ठल-रुक्मिणी नगरात राहतो. तो माजी सैनिक आहे. नागपुरात श्री सिक्युरिटी एजन्सी नावाने तो सुरक्षा एजन्सीही चालवितो. त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी बाजूच्या राजाराणी मंगल कार्यालयासमोर रविवारी रात्री होळी पेटविली. पूजा-अर्चना झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून या ठिकाणी शेजारी रंग खेळले.
सायंकाळी सिंग याच्या शेजारी राहणारे ओंकार गंगाधर तिवसकर यांनी होळीची राख साफ करण्यासाठी पाईपने पाणी मारले. त्यामुळे राखडीसह पाण्याचा लोट सिंग यांच्या अंगणात (दारासमोर) साचला. यावरून आरोपी चिडला. त्याने शेजाऱ्यासोबत वाद घालून घाणेरड्या शिव्या आणि धमकी देऊ लागला.
त्यामुळे ओंकार गंगाधर तिवसकर आणि इतर शेजारी गोळा झाले. बाचाबाचीनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली.
त्यानंतर आरोपी सिंग त्याच्या घराच्या बाल्कनीत आला आणि १२ बोअरची बंदूक काढून त्याने गोळीबार केला. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारामुळे परिसरात प्रचंड दहशत आणि तणाव निर्माण झाला. अल्पावधीतच राजाराणी मंगल कार्यालयासमोर मोठी गर्दी जमली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार भटकर, उपनिरीक्षक मिथिलेश त्रिपाठी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत वरिष्ठ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहचले.(प्रतिनिधी)