सबकुछ ‘वेटिंग’, जागेसाठी ‘सेटिंग’
By Admin | Updated: November 13, 2015 02:41 IST2015-11-13T02:41:18+5:302015-11-13T02:41:18+5:30
शिक्षण, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात राहणारे हजारो तरुण-तरुणी दिवाळीसाठी उपराजधानीत पोहोचले आहेत.

सबकुछ ‘वेटिंग’, जागेसाठी ‘सेटिंग’
मुंबई, पुण्याकडे परतण्यासाठी धडपड : बस तिकिटांचे दर विमानाएवढे
नागपूर : शिक्षण, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात राहणारे हजारो तरुण-तरुणी दिवाळीसाठी उपराजधानीत पोहोचले आहेत. दिवाळीचे पाच दिवस संपायचे असले तरी मात्र यातील अनेकांना आता चिंता लागली आहे ती परत जाण्याच्या व्यवस्थेची. जवळपास सर्वच मार्गांवरील बस, रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. खासगी बसेसचे दर दोन हजारांपर्यंत पोहोचले आहेत. अशास्थितीत ‘कन्फर्म’ जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीत प्रवाशांची होणारी भरमसाट गर्दी पाहता, रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी तर शुक्रवारी आणि सोमवारी विशेष गाडी आहे. परंतु सोमवारी कार्यालयात जायचे असल्यामुळे बहुतांश जण शनिवार किंवा रविवारी निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विशेष गाडीमध्ये जागा असूनदेखील ती फायद्याची नसल्याचे मत काही तरुणांनी व्यक्त केले. एसटी महामंडळानेही पुणेसाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. परंतु ‘एसटी’च्या बसेसची अवस्था लक्षात घेता १६ ते १८ तास प्रवास केल्यानंतर लगेच कार्यालयात जाणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेरचा पर्याय म्हणून ‘एसटी’ला प्राधान्य देण्यात येत आहे.
त्यामुळे नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांचा ओढा कायम असल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसचे भाडे तीन हजारांहून अधिक पर्यंत पोहोचले आहे. दररोज पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘हाऊसफुल्ल’ होत असून, भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे कशाही परिस्थितीत रेल्वेचे तिकीट मिळावे यासाठी तरुणाईची धडपड सुरू आहे. यासाठी वेगवेगळ््या ‘ट्रॅव्हल एजन्सी’, दलाल इत्यादींशी संपर्क साधण्यात येत आहे. परंतु त्यांच्याकडून तिकिटासाठीच्या ‘कमिशन’चे दर वाढवून देण्यात आलेले आहेत.
एकेका तिकिटामागे चक्क हजारांहून अधिकचे ‘कमिशन’ घेण्यात येत आहे. काही जणांनी तर चक्क ‘व्हीआयपी’ तिकिटांसाठी ‘सेटिंग’ सुरू केली आहे. परंतु या तिकिटांची संख्या कमी असल्यामुळे यातील किती जणांचे तिकीट ‘कन्फर्म’ होतील हा देखील प्रश्नच आहे. (प्रतिनिधी)
विमानाचे दर आवाक्याबाहेर
बसच्या तिकिटांचे दर विमानाएवढे झाले आहेत. परंतु विमानाचे दर तर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. शनिवारी पुण्याला जाणाऱ्या विमानांचे दर आठ हजारांहून अधिक आहेत, तर रविवारचे दर तर चक्क दहा हजारांपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या तिकिटांचे दर तर चक्क १२ ते १५ हजारांच्या घरात आहेत.