आयुर्वेदातील विज्ञान प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:19 AM2018-05-19T00:19:01+5:302018-05-19T00:19:13+5:30

आज बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवे आजार वाढत आहेत. अशावेळी आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी महत्त्वाची पद्धती आहे. पाश्चात्त्य देशही आज अ‍ॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे पाहत असून मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्या देशातील या वैद्यकीय खजिन्याचा आपण आदर करणे व त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे, असे मत आयुर्वेद तज्ज्ञ व भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या प्राध्यापक डॉ. रमा जयसुंदर यांनी व्यक्त केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आयुर्वेदसंबंधी विविध पैलूंवर  आपले विचार मांडले.

Everyone needs to accept science in Ayurveda | आयुर्वेदातील विज्ञान प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज

आयुर्वेदातील विज्ञान प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देआयुर्वेदतज्ज्ञ रमा जयसुंदर : लोकमतशी विशेष मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा उगम २०० वर्षांपासूनचा आहे. मात्र आयुर्वेद विज्ञानाचा प्रवास ५००० वर्षापासून सुरू आहे. दोन्ही चिकित्सा पद्धतीचे स्वतंत्र महत्त्व आहे. अ‍ॅलोपॅथी चिकित्सा ही आजारावर लक्ष केंद्रित करणारी आहे. आयुर्वेद हे आरोग्याचा पूर्वेतिहास, आहार, अ‍ॅक्टीव्हीटी, पर्यावरण या संपूर्ण घटकांचा विचार करून उपचार करणारी पद्धती आहे.
आज बदलती जीवनशैली व चुकीच्या आहार पद्धतीमुळे नवनवे आजार वाढत आहेत. अशावेळी आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी महत्त्वाची पद्धती आहे. पाश्चात्त्य देशही आज अ‍ॅलोपॅथीला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे पाहत असून मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहेत. त्यामुळे आपल्या देशातील या वैद्यकीय खजिन्याचा आपण आदर करणे व त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे, असे मत आयुर्वेद तज्ज्ञ व भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)च्या प्राध्यापक डॉ. रमा जयसुंदर यांनी व्यक्त केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आयुर्वेदसंबंधी विविध पैलूंवर  आपले विचार मांडले.
प्रश्न : आयुर्वेद शास्त्राची अ‍ॅलोपॅथीशी तुलना करणे योग्य आहे का?
आयुर्वेद आणि मॉडर्न मेडिसीन (अ‍ॅलोपॅथी) यांची तुलना करणे किंवा आयुर्वेदाला कमकुवत समजणे योग्य नाही. दोन्ही शास्त्र वैद्यकीय क्षेत्रात मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्वरित उपचार, शल्यक्रिया व आकस्मिक सेवेसाठी अ‍ॅलोपॅथी महत्त्वाची आहे. मात्र पूर्व प्रतिबंध, प्रतिकार शक्ती व आहाराचा समतोल राखून उपचार साधण्यात आयुर्वेदाचे महत्त्व आहे. आधुनिक जीवनशैलीत वाढणारे नवनवे आजार बघता अ‍ॅलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदही मोलाची भूमिका बजावणारे आहे.
प्रश्न : आयुर्वेद शास्त्रात योग्य संशोधन झाले नाही, हे खरे आहे काय?
हे सत्य नाही. हजारो वर्षांपासून आयुर्वेदावर संशोधन सुरू आहे. पूर्वी हे युद्धात वापरणारे वैद्यकीय शास्त्र होते. लढाईत जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करण्यात येत होता व ते दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धासाठी तयार होत होते. कारण ही त्वरित उपचार करणारी पद्धती आहे. आजारांना ओळखूनही त्याचा विकास केला गेला. आयुर्वेद ग्रंथाच्या रुपात डाक्युमेंटेशनही आहे. हजारो वर्षापूर्वी अग्निवेश यांचा उपचार पद्धतीचा सविस्तर सार लिखित आहे. ३००० वर्षापूर्वी चरक यांनी त्यात भर घालून ‘चरकसंहिता’ लिहिली. मात्र काही ग्रंथ गहाळ झाले व काही विशिष्ट भाषेत असल्याने मर्यादेत बांधले गेले. त्यामुळे या शास्त्राचा प्रसार झाला नाही. आताही त्याचे डाक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे.
प्रश्न : आयुर्वेदाचे पदवीधरही अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस का करतात?
आयुर्वेदाच्या डॉक्टरांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करणे अतिशय चुकीचे आहे. तसे करणे म्हणजे आपल्याच शास्त्राची बदनामी करण्यासारखे आहे. दुर्देवाने असे होते, याची खंत वाटते. वास्तविक त्यांचे शिक्षण चुकीच्या पद्धतीने झाले किंवा जनाधार नसल्याने त्यांचा विश्वास कमी झाला आहे. आयुर्वेद ही अतिशय प्राचीन चिकित्सा पद्धत आहे आणि आतापर्यंत यातून कार्य झाले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या शास्त्रावर विश्वास ठेवून कार्य करावे. अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टरही आयुर्वेदाची प्रॅक्टीस करतात. त्यामुळे माध्यमांनीही आयुर्वेदात यशस्वीपणे काम करणाºयांकडे लक्ष केंद्रित करावे. शासनानेही आयुर्वेदाच्या चांगल्या शिक्षणाला व संशोधनाला प्रोत्साहन द्यावे व मुबलक प्रमाणात आयुर्वेदिक औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे.
प्रश्न : आयुर्वेदावर लोकांचा विश्वास कमी का झाला?
आयुर्वेद आजही उत्तम चिकित्सा पद्धत आहे. हजारो वर्ष याच पद्धतीने लोकांचे आरोग्य सुदृढ राहिले आहे. मात्र आज आहार आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष करून त्वरीत उपचार हवा असतो. ही सामाजिक समस्या आहे. या शास्त्राला कमकुवत समजले जाते व मुलांनाही तसेच सांगितले जाते. त्यामुळे नवी पिढी याला दुय्यम स्थान देते. हे शास्त्र एका चौकटीत बंद ठेवणेही याला कारणीभूत ठरले. आयुर्वेद म्हणजे विज्ञान आहे, हे स्वीकार करावे लागेल. लोकांमध्ये याची वैज्ञानिकता समजवावी लागेल आणि हेच माझे ध्येय आहे. पाश्चात्त्य देशात आयुर्वेदाची माहिती घेऊन संशोधन केले जात आहे. मग आपण आपल्याच देशातील शास्त्र त्यांच्याकडून स्वीकारणार आहोत काय? या दोन्ही शास्त्राची सांगड घालून मानवी कल्याणाचा मार्ग सुकर करणे आवश्यक आहे.
प्रश्न : आयुर्वेदाला विशिष्ट धर्माशी जोडणे योग्य आहे का?
धर्माशी जोडणे योग्य नाही. प्राचीन काळच्या ऋषिमुनींकडून हे वैद्यकीय ज्ञान आले असले तरी त्याला विशिष्ट धर्माशी जोडणे योग्य नाही. अ‍ॅलोपॅथीला कु ठल्या विशिष्ट धर्माशी जोडले जात नाही. आयुर्वेद हे विज्ञान आहे आणि त्याचा विज्ञानाप्रमाणे प्रचार आणि स्वीकार झाला पाहिजे.
प्रश्न : वनौषधीवर पर्यावरणाचा परिणाम होत आहे का?
आयुर्वेद हे मानवी जीवन, पर्यावरण, कृषी, मानसिक प्रक्रिया यांचा विचार करणारे शास्त्र आहे. पर्यावरणाचा ºहास हा वनौषधींसह सर्वच दृष्टीने हानीकारक आहे. शासनाने वनौषधीच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे व चांगली वनसंपदा परदेशात विकू नये.
कोण आहेत रमा जयसुंदर?
डॉ. रमा जयसुंदर यांनी १९९० मध्ये त्यांनी केंम्ब्रिज विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात ‘न्यूक्लियर मॅग्नेटीक रेसोनन्स’ या संशोधनात पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र त्यांना वैद्यकीय शास्त्राची पदवी संपादन करायची होती. माध्यमिक शिक्षणात जीवशास्त्र विषय नसल्याने त्यांनी अकरावीपासून परत जीवशास्त्र शिक्षण केले व त्यानंतर आयुर्वेद शास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यानंतर परत एम्समध्ये नोकरी जॉईन केली. आज त्या आधुनिक वैद्यकीय शास्त्राशी सांगड घालून आयुर्वेदाचे संशोधन करीत असून त्यांचे अनेक संशोधन ग्रंथ तयार आहेत.

 

Web Title: Everyone needs to accept science in Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.