सर्वांनीच केली मौजमस्ती

By Admin | Updated: June 17, 2016 03:09 IST2016-06-17T03:09:22+5:302016-06-17T03:09:22+5:30

वृषभ अरुण सेलोटकर (२१, रा. न्यू सुभेदार ले आऊट, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव भापकर, रा. नागपूर याचा बुधवारी वाढदिवस होता.

Everyone did the fun | सर्वांनीच केली मौजमस्ती

सर्वांनीच केली मौजमस्ती

‘बर्थ डे’ पार्टी बेतली जीवावर
नागपूर : वृषभ अरुण सेलोटकर (२१, रा. न्यू सुभेदार ले आऊट, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव भापकर, रा. नागपूर याचा बुधवारी वाढदिवस होता. त्यामुळे वैभव, वृषभ व त्यांचे अन्य १० मित्र बर्थ डे पार्टी साजरी करण्यासाठी बुधवारी दुपारी हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळ गेले होते. त्यांनी सोबत जेवण तयार करण्याचे साहित्यदेखील नेले होते. सुरुवातीला या सर्वांनी मौजमस्ती केली. जेवण तयार झाल्यानंतर वैभवने सर्वांना जेवण करण्याची विनंती केली. त्यातच काही मित्रांनी आधी आंघोळ करून नंतर जेवण करू, अशी आग्रही भूमिका घेतली.
दरम्यान, वृषभसह अन्य पाचजण तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले. काठावर बसलेला एक मित्र त्यांचे मोबाईलने फोटो घेत होता. काही वेळातच वृषभ खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब इतरांच्या लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी पाण्याबाहेर पळ काढला आणि वृषभ पाहता-पाहता पाण्यात दिसेनासा झाला. यातील एका मित्राने सदर घटनेची सूचना हिंगणा पोलिसांना दिली. पोलीस रात्री ७ वाजताच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृषभचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अंधारामुळे वृषभला शोधण्यात यश आले नाही.
परिणामी, गुरुवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास वृषभचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर वृषभचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेचा तपास ठाणेदार हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल संजय बतखळ करीत आहेत. (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी)

Web Title: Everyone did the fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.