नागपूर : शहराच्या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनातून प्रदूषण हाेते, पण ते तंताेतंत किती प्रमाणात हाेते, हे अद्याप सांगता येत नव्हते. आता मात्र ते शक्य हाेणार आहे. नीरीच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा आधार घेत ठराविक रस्त्यावर दिवसाला किती व काेणत्या प्रकारची वाहने धावली आणि त्यातून किती प्रमाणात प्रदूषण उत्सर्जित झाले, याचे ‘रियल टाईम’ माेजमाप करणारे डॅशबाेर्ड विकसित केले आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-नीरी) मधील वैज्ञानिकांनी ‘एआय आधारित लाइन सोर्स एमिशन इन्व्हेंटरी (एआय-एलएसईआय) डॅशबोर्ड विकसित केला आहे. हा डॅशबोर्ड शहरांतील रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांची रिअल टाइम ओळख करून प्रति तास उत्सर्जनाचा अंदाज लावते आणि प्रदूषण हॉटस्पॉट्सचे दृश्यात्मक नकाशीकरण करते. नीरीचे संचालक डॉ. एस. वेंकटा मोहन यांच्या मार्गदर्शनात वायु गुणवत्ता व्यवस्थापन विभागातील वैज्ञानिक डॉ. राहुल व्यवहारे, डॉ. के. व्ही. जॉर्ज, डॉ. जयसिंग राजपूत, तसेच अभियांत्रिकीचे विद्यार्थी अथर्वा मलोडे, राज सोनारघरे, प्रणव नायर यांच्या टीमने विकसित केला आहे.
वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित एमिशन फॅक्टर्स आणि वाहनांच्या प्रकाराशी संबंधित माहितीच्या आधारे हा डॅशबोर्ड धुलीकण (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम), नायट्रोजन ऑक्साइड्स (NO₂), कार्बन मोनॉक्साइड (CO) आणि हायड्रोकार्बन्स (HC) या प्रमुख वायू प्रदूषकांच्या उत्सर्जनाची गणना करतो. हे परिणाम जीआयएस नकाशावर (जीआयएस-मॅप) प्रदर्शित केले जातात, ज्यामुळे वाहनांमुळे शहरातील जास्त प्रदूषण होणारे ठिकाण सहज ओळखता येतात.
त्या रस्त्यावर काेणत्या प्रकारची वाहने धावली?
हा डॅशबोर्ड शहरातील रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या थेट व्हिडिओ फीडवर आधारित कार्य करतो. या माध्यमातून रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, कार, हलकी व्यावसायिक वाहने, जड व्यावसायिक वाहने, बस आणि ट्रॅक्टर यांसारख्या विविध प्रकारच्या बीएस-१ पासून बीएस-६ पर्यंतच्या वाहनांची ओळख करून त्यांची मोजणी केली जाते. वाहनांचे प्रकार, इंधन प्रकार, इंजिन प्रकार आणि विशिष्ट रस्त्यांच्या स्थानांनुसार या डॅशबोर्डवर प्रतितास व प्रतिदिन किती प्रदूषण उत्सर्जित झाले याचा डाटा उपलब्ध करताे.
वायु गुणवत्ता व्यवस्थापनासह वाहतूक नियाेजनही शक्य हाेईल
ही प्रणाली शहर प्रशासनाला जास्त उत्सर्जन असलेले वाहतूक मार्ग ओळखणे, प्रदूषणाची उच्च पातळी असलेले कालखंड समजून घेणे आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन धोरणे आखणे यासाठी मदत करू शकते. यामुळे शहरी वाहतूक नियोजन, वाहतूक कोंडी नियंत्रण आणि वायू गुणवत्ता व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक आधारावर निर्णय घेणे शक्य होईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला.
पायलट प्राेजेक्ट यशस्वी
नीरीने दाेन वर्षापासून यावर कार्य सुरू केले आहे. वर्धा राेडवरील त्यांच्या गेटसमाेर अशाप्रकारे कॅमेरे लावले आहेत. त्या रस्त्यावर किती व काेणत्या प्रकारची वाहने गेली, या आधारे दरराेजच्या प्रदूषणाचे अवलाेकन केले आहे. गणनेनुसार या रस्त्यावरील वाहनातून प्रतिदिन सर्वाधिक ५३ किलाेग्रॅम कार्बन माेनाक्साईडचे उत्सर्जन हाेते. २१ जानेवारी राेजी क्रिकेट सामन्याच्या दिवशी ८८ किलाे उत्सर्जन झाले हाेते.
"हा डॅशबोर्ड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंलबजावणीसाठी तांत्रिकदृष्ट्या तयार आहे. नीरीने महापालिका, वाहतूक पाेलीस विभाग, परिवहन विभाग यांना या तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक सादर केले आहे. त्यांचे सहकार्य मिळाले तर तत्काळ अंमलबजावणी करता येईल. ही यंत्रणा देशातील प्रत्येक शहरात वापरता येईल व त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत."- डाॅ. एस. व्यंकटा माेहन, संचालक, सीएसआयआर, नीरी
Web Summary : NEERI developed an AI-powered dashboard for real-time vehicle emission monitoring. It identifies vehicle types via CCTV, estimates pollution, and maps hotspots. This aids traffic management and air quality control, successfully piloted in Nagpur.
Web Summary : नीरी ने वाहनों के उत्सर्जन की निगरानी के लिए एआई-संचालित डैशबोर्ड विकसित किया। यह सीसीटीवी से वाहनों की पहचान करता है, प्रदूषण का अनुमान लगाता है और हॉटस्पॉट का नक्शा बनाता है। यह नागपुर में सफलतापूर्वक परीक्षण किया गया।