राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ सांभाळणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:51+5:302020-12-02T04:04:51+5:30
नागपूर : आजवर राजकीय फायद्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा वापर झाला. प्रत्यक्षात पदवीधरांचे प्रश्न मांडले गेले नाही. यावेळी परिवर्तन घडवून राजकीय ...

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ सांभाळणार ()
नागपूर : आजवर राजकीय फायद्यासाठी पदवीधर मतदारसंघाचा वापर झाला. प्रत्यक्षात पदवीधरांचे प्रश्न मांडले गेले नाही. यावेळी परिवर्तन घडवून राजकीय लाभ थांबविण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीतर्फे प्रश्नांची जाण असलेले ॲड. अभिजित वंजारी रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता बूथवर उपस्थित राहून काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
गोंदिया येथील वैभव लॉन आयोजित सभेत ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराचा समारोप झाला. सभेला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आ. सहसराम कोरोटे उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी ॲड. वंजारी यांच्या समर्थनार्थ विदर्भातील सर्व संघटना आणि नेते एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, युवा उमेदवारामुळे मतदारांमध्ये उत्साह आहे. वंजारी यांचा थेट मतदारांशी संपर्क आहे. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढेल व त्याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक समन्वय समितीची बैठक
-महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिती, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्य.स्तर) आयइडीएसएस या संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आशिष दुआ, आ. विकास ठाकरे संघटनेचे अध्यक्ष विनोद नाकाडे, सचिव सतीश वंजारी, डॉ. बबनराव तायवाडे , गिरीश पांडव आदी उपस्थित होते.
मंत्री, अध्यक्षांनी घेतली बैठक
- ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी बैठक घेत नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, काँग्रेसच्या विविध आघाड्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पदवीधर मतदारसंघात निश्चितच परिवर्तन घडेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
ॲड. वंजारी यांचा युवाशक्तीशी लाईव्ह संवाद
- ॲड. अभिजित वंजारी यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवाशक्तीशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी पदवीधरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली व स्वत:चे व्हिजन मांडले.