अखेर पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:44+5:302021-01-17T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन वर्षांत अनेकदा घोषणा झाल्यानंतर अखेर आता स्थानिक वाहतूक शाखेच्या पोलिसांना २०० बॉडी वॉर्न ...

अखेर पोलिसांना मिळाले बॉडी वॉर्न कॅमेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वर्षांत अनेकदा घोषणा झाल्यानंतर अखेर आता स्थानिक वाहतूक शाखेच्या पोलिसांना २०० बॉडी वॉर्न कॅमेरे मिळाले. गृहमंत्र्यांच्या हस्ते रविवारी दुपारी पोलीस जिमखान्यात या कॅमेरा वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना गेल्या दोन वर्षांत नागपुरात घडल्या. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस अत्यंत उर्मटपणे बोलतात, अपमान करतात. चिरीमिरीसाठी वेठीस धरतात आणि कायदा सांगितला की हल्ल्याची तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची तक्रार दाखल करून वाहनचालकांना कोठडीत डांबतात, अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत होत्या. या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींमुळे शहर पोलीस आयुक्तालयाकडून वाहतूक पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे मिळावेत म्हणून अनेकदा मागणी नोंदविण्यात आली होती. त्याचा पाठपुरावाही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अखेर दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलाला २०० बॉडी कॅमेरे मिळाले. हे कॅमेेरे शरीरावर लावून वाहतूक शाखेचे पोलीस काम करणार आहेत. त्यासंबंधीचे प्रशिक्षणही वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते १० पोलिसांना कॅमेरे देण्यात येणार असून रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास हा कार्यक्रम पोलीस जिमखान्यात पार पडणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार प्रामुख्याने उपिस्थत राहणार आहेत.
---
‘चहापाण्याला आळा बसणार’
थेट शरीरावरच कॅमेरा लावून पोलीस काम करणार असल्याने त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप आता कुणी लावू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे पोलिसांनाही वाहनचालकांसोबत मानापानानेच बोलावे लागणार आहे. ‘चहापाण्याच्या नावाखाली उकळल्या जाणाऱ्या चिरीमिरीला’ही कॅमेऱ्यामुळे आळा बसणार आहे.