प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये होऊनही गर्दी ओसरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:28+5:302021-03-14T04:07:28+5:30
नागपूर : लॉकडाऊनमध्ये रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद केली होती; परंतु अनलॉक झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा प्लॅटफाॅर्म तिकिटांची ...

प्लॅटफाॅर्म तिकीट ५० रुपये होऊनही गर्दी ओसरेना
नागपूर : लॉकडाऊनमध्ये रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद केली होती; परंतु अनलॉक झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुन्हा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू केली आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर ५० रुपये आहेत, परंतु तरीसुद्धा नागरिक प्लॅटफाॅर्म तिकीट खरेदी करीत असून यामुळे रेल्वेस्थानकावरील गर्दी वाढत आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट सुरु केल्यामुळे सुविधा झाल्याची प्रतिक्रिया रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.
सध्या धावतात ७५ रेल्वेगाड्या
लॉकडाऊनमध्ये रेल्वेगाड्या ठप्प झाल्या होत्या. केवळ मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु होती, परंतु हळूहळू रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना काही नियम घालून दिले आहेत. यात मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे, प्रवासाच्या दोन तास आधी रेल्वेस्थानकावर पोहोचणे आदींचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत असून प्रवासापूर्वी प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. सध्या नागपूर रेल्वेस्थानकावरून ७५ रेल्वेगाड्या ये-जा करीत आहेत. विशेष रेल्वेगाड्या सुरु झाल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
दररोज प्रवास २९०० करतात
कोरोनाच्या पूर्वी १५ हजार प्रवासी प्रवास करीत होते, परंतु विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्यानंतर रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली असून केवळ २९०० प्रवासीच दररोज प्रवास करीत आहेत. यामुळे रेल्वेस्थानकावर पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट सुरु केल्यामुळे रेल्वेस्थानकावर नागरिकांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पहिल्याच दिवशी ६२२ प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
लॉकडाऊनमध्ये प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद होती, परंतु अनलॉकमध्ये बहुतांश नागरिक नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर गैरसोय होत होती. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरु करण्याची मागणी प्रवाशांचे नातेवाईक करीत होते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने १२ मार्चपासून प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरु केली, परंतु रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर ५० रुपये करण्यात आले आहेत. प्लॅटफाॅर्म तिकिटाची विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ६२२ प्लॅटफाॅर्म तिकिटे विकली गेली. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सोडणे सोयीचे झाले
‘प्लॅटफाॅर्म तिकीट बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेगाडीत बसवून देणे जमत नव्हते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आपले सामान गाडीपर्यंत न्यावे लागत होते. परंतु आता प्लॅटफाॅर्म तिकीट सुरु झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुविधा झाली आहे.’
-प्रमोद वाघमारे, नागरिक
नातेवाईकांना निरोप देण्याची सुविधा झाली
‘नातेवाईकांना निरोप देण्यासाठी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर बाहेरुनच त्यांना निरोप द्यावा लागत होता, परंतु प्लॅटफाॅर्म तिकीट सुरु झाल्यामुळे रेल्वेगाडीपर्यंत त्यांचे सामान पोहोचविण्याची आणि त्यांना निरोप देण्याची सुविधा झाली आहे.’
-प्रवीण राठोड, नागरिक
प्रवाशांना सुविधा देण्यासाठी निर्णय
‘प्रवाशांना अधिक सुविधा प्रदान करण्यासाठी रेल्वे बोर्डाने प्लॅटफाॅर्म तिकीट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही.’
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग
.............