धारदार तरीही अहिंसक ‘हास्यदर्शन’
By Admin | Updated: January 8, 2017 02:14 IST2017-01-08T02:14:26+5:302017-01-08T02:14:26+5:30
एखादी गोष्ट परंपरागत पद्धतीने सरळमार्गी सांगितली तर ती कालांतराने विस्मृतीत जाते. पण, तीच गोष्ट

धारदार तरीही अहिंसक ‘हास्यदर्शन’
देशभरातील व्यंगचित्रकारांचा सहभाग : कम्बाईन आणि कार्टुनिस्ट झोनचे संयुक्त आयोजन
नागपूर : एखादी गोष्ट परंपरागत पद्धतीने सरळमार्गी सांगितली तर ती कालांतराने विस्मृतीत जाते. पण, तीच गोष्ट चमत्कृतीपूर्ण, नाट्यमयतेने किंवा विनोदाची झालर सजवून सांगितली तर ती दीर्घ काळापर्यंत लक्षात राहते. व्यंगचित्रांचेही तसेच आहे. उत्तम व्यंगचित्र हे पाहणाऱ्यांना आयुष्याकडे खेळकर दृष्टीने बघायची दृष्टी देते. व्यंगचित्र हे धारदार असले तरीही अहिंसक शस्त्र आहे. अशाच काही व्यंगचित्रांचे एक सुुंदर प्रदर्शन चिटणवीस सेंटरच्या रंगायन कला दालनात सुरू आहे. कम्बाईन आणि कार्टुनिस्ट झोनतर्फे आयोजित या प्रदर्शनात देशभरातील व्यंगचित्रकार आपल्या चित्रांसह सहभागी झाले आहेत.(प्रतिनिधी)
व्यंगचित्रकारांनी अराजकतेला लक्ष्य करावे
अभय बंग : मनोहर सप्रे यांना जीवनगौरव प्रदान
नोटाबंदी करू शकणारी राज्यव्यवस्था मतदानही बंद करू शकते, हे राजकारण्यांनी विसरू नये. व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्राला राजकीय धार असेल तर राजकारणातील आणि समाजातील लोक प्रगल्भ होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. कार्टुनिस्टस् कम्बाईन आणि कार्टुनिस्ट झोनतर्फे चिटणवीस सेंटरच्या रंगायन कला दालनात व्यंगचित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्रकारांच्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे, चारुहास पंडित, विनय चाणेकर उपस्थित होते. या समारंभात ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, जीवनगौरव पुरस्कारामागे सप्रे यांची विविध क्षेत्रातील तपस्या आहे. साधा विनोद आणि कार्टुनिस्टचा विनोद यात फरक असला पाहिजे. राजकीय, सामाजिक, तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब व्यंगचित्रातून उमटले पाहिजे. सप्रे हे राजकीय कार्यकर्ते, लोकजीवनाचे निरीक्षक असल्यामुळे या सर्वांची झलक त्यांच्या व्यंगचित्रात पाहायला मिळते. गौरवमूर्ती मनोहर सप्रे म्हणाले, भ्रष्टाचार, अन्याय हे व्यंगचित्राचे विषय आहेत. २० वर्षापूर्वीची स्थिती अद्यापही कायम आहे. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व्यंगचित्राच्या माध्यमातून तयार होते. त्यामुळे संपूर्ण जीवनाला विनोदाचे असलेले अस्तर ओळखता आले पाहिजे. विनय चाणेकर यांनी व्यंगचित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्टुनिस्ट झोनची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. चारुहास पंडित यांनी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे दालन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रशांत कुळकर्णी यांनी केले. डॉ. अभय बंग यांच्या हस्ते २५ हजार रोख, मानपत्र देऊन मनोहर सप्रे यांचा गौरव करण्यात आला. समारंभात ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे, बापू घावरे यांना आदरांजली वाहण्यात आली. या संमेलनात महाराष्ट्रातील ७० व्यंगचित्रकार सहभागी झाले आहेत. नवोदितांनाही प्रदर्शनात आपली कला मांडण्याची संधी मिळणार आहे. संचालन संजीवनी भिसे यांनी केले. आभार राजू गायकवाड यांनी मानले. यावेळी नागपूरचे व्यंगचित्रकार संजय मोरे यांनी मनोहर सप्रे यांना त्यांचे अर्कचित्र भेट दिले.