म्हातारपणातही काबाडकष्टच
By Admin | Updated: December 19, 2014 00:49 IST2014-12-19T00:49:58+5:302014-12-19T00:49:58+5:30
डोक्यावर छप्पर नसल्यामुळे रेल्वेच्या जमिनीत झोपडी उभारली. मूलबाळ नसल्यामुळे आणि पतीकडूनही काम होत नसल्यामुळे तुमसर जिल्हा भंडारा येथील सरस्वती सूर्यवंशी या ७० वर्षांच्या वृद्ध महिलेला

म्हातारपणातही काबाडकष्टच
शरीर थकले : शासनाने मदतीचा हात देण्याची अपेक्षा
दयानंद पाईकराव - नागपूर
डोक्यावर छप्पर नसल्यामुळे रेल्वेच्या जमिनीत झोपडी उभारली. मूलबाळ नसल्यामुळे आणि पतीकडूनही काम होत नसल्यामुळे तुमसर जिल्हा भंडारा येथील सरस्वती सूर्यवंशी या ७० वर्षांच्या वृद्ध महिलेला म्हातारपणातही मजुरी करण्याची पाळी आली आहे. त्यांच्याप्रमाणेच निलज ता. पवनी जिल्हा भंडारा येथील विठाबाई पाटील ही महिलाही ७० वर्षांच्या वयातही काबाडकष्ट करून उपजीविका भागवीत आहे. शासनाने म्हातारपणात तरी मदतीचा हात द्यावा, अशी माफक अपेक्षा त्यांनी मोर्चात सहभागी होऊन व्यक्त केली.
सरस्वती सोमालाल सूर्यवंशी (७०) रा. तुमसर जिल्हा भंडारा या वयोवृद्ध महिलेवर म्हातारपणातही काबाडकष्ट करण्याची वेळ आली आहे. सरस्वतीचे पती सोमालाल ७५ वर्षांचे आहेत. त्यांच्याकडूनही या वयात कष्ट होत नाही. मूलबाळ नसल्यामुळे या दोघांचाही सांभाळ करणारे असे कुणीच नाही. रेल्वेच्या जागेत झोपडी उभारून त्यांनी डोक्यावर छप्पर केले. धुणीभांडी आणि मिळेल ते काम करून त्या आपला आणि पतीच्या पोटाची खळगी भरत आहेत. तीन वर्षांपासून श्रावणबाळ योजनेचे मानधन ५,४०० रुपये मिळावे यासाठी त्या विधानभवनाचा उंबरठा झिजवत आहेत. परंतु त्यांच्या मागण्यांवर काहीच निर्णय न झाल्यामुळे या शासनाला आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची कीव येत नाही काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरस्वतीसारखीच व्यथा निलज ता. पवनी जिल्हा भंडारा येथून आलेल्या विठाबाई उरकुडा पाटील (६५) या वयोवृद्ध महिलेने व्यक्त केली.