लाॅकडाऊनमध्येही आठवडी बाजार बिनधास्त सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:02+5:302021-03-17T04:09:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवडाभराचा लाॅकडाऊन जाहीर केला. ...

लाॅकडाऊनमध्येही आठवडी बाजार बिनधास्त सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर शहर पाेलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवडाभराचा लाॅकडाऊन जाहीर केला. त्याअनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजारावरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, एमआयडीसी (ता. हिंगणा) परिसरात मंगळवारी (दि. १६) आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना व जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली हाेत असताना पाेलीस व महसूल प्रशासनाने काेणतीही कारवाई केली नाही.
एमआयडीसी परिसरातील हिंगणा-नागपूर मार्गावरील आयसी चाैकात प्रत्येक शनिवार व मंगळवार असे आठवड्यातील दाेन दिवस माेठा आठवडी बाजार भरताे. यात राेडच्या दाेन्ही बाजूला दुकाने थाटली जातात. या भागात कामगारांचे वास्तव्य माेठ्या प्रमाणात असल्याने या बाजारातील आर्थिक उलाढालही माेठी आहे. काेराेना संक्रमण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनची घाेषणा करीत आठवडी बाजारांवर तात्पुरती बंदी घातली आहे.
मात्र, बंदी असतानाही मंगळवारी (दि. १६) आयसी चाैकात आठवडी बाजार भरवण्यात आला हाेता. भाजीपाला विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली हाेती तर ग्राहकांनीही भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी या बाजारात गर्दी केली हाेती. या बाजारात दुकानदारांसह वावरणाऱ्यांपैकी बहुतेक जण विनामास्क फिरत हाेते तर खरेदी करताना कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले.
काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना, त्यासंदर्भात शासन व जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी यासह अन्य बाबींची तसेच तालुक्यातील महसूल विभाग, एमआयडीसी पाेलीस, पाेलिसांची वाहतूक शाखा तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला चांगली माहिती आहे. परंतु, मंगळवारी भरवण्यात आलेल्या या बाजाराबाबत कुणीही गांभीर्याने घेत साधी दंडात्मक कारवाई करण्याची तसदी घेतली नाही. यावरून काेराेनाबाबत प्रशासनाची अनास्थाही उघड झाली आहे.
...
बाजार चिठ्ठीचीही वसुली
हा आठवडी बाजार हिंगणा तालुक्यातील डिगडाेह (देवी) व नीलडाेह या दाेन ग्रामपंचायतींच्या अखत्यारित येत असून, येथील बाजार चिठ्ठीची वसुलीही या दाेन्ही ग्रामपंचायतींच्या वतीने केली जाते. या बाजार चिठ्ठीतून दाेन्ही ग्रामपंचायतींना वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते. या ग्रामपंचायतींनी बाजार चिठ्ठी वसुलीचे कंत्राट दिले असल्याने कंत्राटदारांची माणसं बाजार भरल्यानंतर दुकानदारांकडून बाजार चिठ्ठीची वसुली करतात. मंगळवारी भरलेल्या बाजारातही बाजार चिठ्ठी वसूल करण्यात आली हाेती. हा बाजार भरवायचा का नाही, याबाबत दाेन्ही ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीत दवंडीद्वारे नागरिकांना सूचना दिली की नाही, याबाबत कुणालाही माहिती नाही.