Corona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 07:00 AM2020-05-29T07:00:00+5:302020-05-29T07:00:07+5:30

गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. परंतु कर्जाला उठाव नाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली.

Even if interest rates fall, debt does not rise | Corona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

Corona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोपान पांढरीपांडे
नागपूर : गेल्या दोन महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २.५० टक्के कपात केल्याने सध्या रेपो रेट ४ टक्क्यांवर आला आहे. परिणामी बँकांनी ठेवी व कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. परंतु कर्जाला उठाव नाही, अशी माहिती नागपुरातील अनेक बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिली.

स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक इत्यादी बँकांनी आपले व्याजदर कमी केले आहेत. अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या सूचनेप्रमाणे रेपो-लिंक्ड-रेट (आरएलआर) ही पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे रेपो रेट कमी/जास्त झाल्यास व्याजाचा दर आपोआप कमी अथवा जास्त होतो. सध्या ठेवीवरील व्याजदर २.९० टक्के ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१० टक्के यादरम्यान आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यावर ०.५० टक्के अधिक व्याज मिळते. परंतु हे दर फारच कमी असल्याने खासगी क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. हरीभाऊ नागमोते एसटीमधून सेवानिवृत्त झाले. माझे बँक ठेवीवरील मासिक व्याज १४ हजारांवरून १३ हजारांवर आले आहे. पेन्शन नसल्याने हा माझ्यासाठी मोठा आघात आहे, असे नागमोते म्हणाले.
ठेवींवरील व्याज कमी झाल्याने बँकांनी कर्जावरील व्याजाचे दरही कमी केले आहेत. सध्या बहुतेक बँकांचा गृहकर्जाचा दर ७.२५ ते १०.२५ टक्क्यांदरम्यान आहे, तर व्यक्तिगत कर्जाचा दरही १० ते १२ टक्के झाला आहे.पण सध्या कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे बहुतेक नागरिकांची प्राथमिकता व्यक्तिगत सुरक्षेकडे आहे. परिणामी व्यक्तिगत कर्ज, वाहन कर्ज अथवा गृहकर्जाला मागणीच नाही, अशी माहिती बहुतेक बँक अधिकाऱ्यांनी दिली.

विनातारण कर्जाला मागणी कमी
कोविड-१९ साठी केंद्र सरकारने जे २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, त्यात ३ लाख कोटी लघु व मध्यम उद्योगांना विनातारण कर्जासाठी ठेवले आहेत. सध्या थकीत असलेल्या खेळत्या भांडवल कर्जाच्या २० टक्के अतिरिक्त कर्ज चार वर्षांत परतफेडीच्या कराराने उद्योजकांना मिळणार आहे. पण त्यालाही फारसा उठाव नाही, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर सध्या गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना ३ लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज देण्याची अनोखी योजना बँक आॅफ महाराष्ट्रने आणली आहे, अशी माहिती झोनल मॅनेजर मनोज करे यांनी दिली.

प्रवासी मजुरांचा तुटवडा व बाजारपेठा बंद असल्याने लघु व मध्यम उद्योजक व्यवसाय/कारखाने सुरू करण्यास अनुत्सुक आहेत. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यानंतरच कर्जाची मागणी वाढेल, असे अधिकाऱ्यांना वाटते.

ठेवींवरील व्याजदर
बँक व्याजदर

स्टेट बँक २.९० ते ५.१०
पंजाब नॅशनल बँक ३.०० ते ५.४०

बँक ऑफ इंडिया २.०० ते ५.७०
बँक ऑफ महाराष्ट्र ३.०० ते ५.००

इंडियन ओव्हरसीज ३.०० ते ५.१०

कर्जावरील व्याजदर
बँक गृहकर्ज व्यावसायिक कर्ज

स्टेट बँक ७.४० ते ८.१० ८.५० ते १२.००
पंजाब नॅशनल बँक ७.५० ते ९.०० ८.७५ ते १२.५०

बँक ऑफ इंडिया ७.२५ ते ९.०० ८.२५ ते १२.००
बँक ऑफ महाराष्ट्र ७.०० ते ९.०० ८.५० ते १३.००

इंडियन ओव्हरसीज ७.२५ ते ९.२५ ८.७५ ते १२.५०

 

Web Title: Even if interest rates fall, debt does not rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.