लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षात जे उरले सुरले कार्यकर्ते आहे ते सांभाळण्यावर भर दिला पाहिजे. जर त्यांच्या पक्षातील किंवा कुणीही हिंसाचाराबाबत बोलत असेल तर सरकार गंभीरतेने पावले उचले. कुणीही हिंसाचार केला तरी सरकार त्याला सोडणार नाही, या शब्दांत बावनकुळे यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा काळ आता गेला. आता कायद्याचे राज्य आहे, हिंसाचार केल्यास सरकार चूप बसणार नाही आणि सरकार सोडणार नाही. कुठे हिंसाचार करते ते आम्ही बघू किती धमक आहे, असे बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे सनातन धर्माविरोधात मत मिळवण्यासाठी वक्तव्य करत असतात. त्यांनी हिंदू धर्माबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य केले तरी ते निवडून येणार नाही. हिंदू समाजाच्या भावना भडकवण्याचा काम जितेंद्र आव्हाड यांनी करू नये असेदेखील बावनकुळे म्हणाले.
उद्या जरी निवडणूक झाल्यास तरी आम्हीच जिंकणारउद्या जरी स्थानिक स्वराज्य निवडणूक झाल्यास भाजप तयार आहे. प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बूथपर्यंत आमचे संघटन झाले आहे.कार्यकारिणी पूर्ण झाल्या आहेत. विधानसभामध्ये ५१.७८ टक्के मत घेऊन आम्ही जिंकलो होतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जिंकणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला.
महसूल परिषदेत साडेतीनशे सुधारणा सुचविल्यानागपूर येथे झालेल्या दोन दिवसीय महसूल परिषदेमध्ये अधिकाऱ्यांनी जवळपास साडेतीनशे सुधारणा सुचविल्या आहेत. महसूल परिषदेमध्ये विषयावर अभ्यासगट तयार करून महसुली प्रशासनात काय बदल केले पाहिजे, जुने कायदे कालबाह्य झाले आहे, त्यात काय बदल केले पाहिजे, जिल्हा नियोजनमध्ये काय बदल केले पाहिजे यावर सर्व जिल्हाधिकाऱ्या सोबत चर्चा झाली आहे. २०३५ चा विकसित महाराष्ट्र आणि त्यासाठी लागणारे महसूल खात्याचे काम यासाठी दिशा देण्याचे नियोजन या बैठकीत झाले आहे. एकही तक्रार किवा अर्ज येणार नाही असा महसूल विभाग तयार करायचा आहे, असे बावनकुळे म्हणाले.