दीड वर्षे झाली तरी कामाला अद्याप गती नाही
By Admin | Updated: April 9, 2017 02:26 IST2017-04-09T02:26:45+5:302017-04-09T02:26:45+5:30
शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. एकाच वेळी शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे.

दीड वर्षे झाली तरी कामाला अद्याप गती नाही
आणखी किती वर्ष लागणार? : अजनी रेल्वे ते अजनी चौक रोडची अवस्था दयनीय
नागपूर : शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. एकाच वेळी शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. परंतु या रस्त्यांची कामे कासवगतीने सुरू आहेत. अजनी रेल्वे पूल ते अजनी चौक या दरम्यानच्या सिमेंट रोडचे काम तब्बल दीड वर्षानंतर सुरू झाले, पण कामाला गती नाही.
या कामाला आधीच विलंब झाला आहे. आता या कामाला सुरुवात झाली. परंतु गती नसल्याने काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रोडच्या एकाच बाजूला वाहतूक सुरू आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. एका बाजूची वाहतूक बंद असल्याने चुनाभट्टी भागातील नागरिकांना त्रास होत आहे. चुनाभट्टी हा वळणमार्ग असल्याने सायंकाळच्या सुमारास या मार्गावरील वाहतुक ीची कोंडी होते.
या रोडची प्रत्यक्ष पाहणी केली असता अजनी रेल्वे पूल चौकात टिन लावून एका बाजूचा मार्ग बंद करण्यात आला आहे. येथे मोठे फलकही लावण्यात आले आहे. यावरील मजकुरानुसार या रोडचे काम महापालिकेने मुंबईच्या युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सध्या एका बाजूने सिमेंट रोडचे काम सुरू आहे.
युनिटी इन्फ्राप्रोजेक्टला २१ जानेवारी २०१५ रोजी कार्यादेश देण्यात आले. जानेवारी २०१७ पर्यंत पूर्ण करावयाचे होते. परंतु
कार्यादेशानंतर दीड वर्षाने कामाला सुरुवात करण्यात आली. बाजूलाच दुसरा फलक लावण्यात आला आहे. यावर वाहतूक पोलीस उपायुक्तांनी मार्ग वळविण्यात आल्याची सूचना लिहिली आहे. यावर ११ जानेवारी २०१८ ही तारीख आहे. त्यामुळे कंपनीने जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. आधीच कामाला विलंब झाला असतानाही गती नाही. पावसाळा सुरू होण्याला दोन महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. कामाची गती अशीच राहिल्यास पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. (प्रतिनिधी)
कामाची गती का थांबली
महापालिका निवडणुका विचारात घेता गेला पावसाळा संपताच शहरातील सर्व भागात दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडच्या भूमिपूजनाचा धडाका लावला होता. सुरुवातीला दिवसरात्र या रोडची कामे सुरू होती. कामाची गती लक्षात घेता सहा महिन्यात सिमेंट रोडची कामे पूर्ण होतील, असा शहरातील नागरिकांना विश्वास होता. परंतु निवडणुका संपताच कामे ठप्प पडली. अचानक कामाची गती का थांबली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कामाचा उत्तम दर्जा कसा राहणार?
या कामाच्या ठिकाणी सकाळी भेट दिली असता येथे एकही मजूर कामावर नव्हता. अजनी रेल्वे पूल ते चुनाभट्टी दरम्यान एका बाजूने सिमेंटचा थर टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी त्यावर खाली बारदाना झाकण्यात आला आहे. परंतु पाणी टाकण्यात आले नव्हते. या संदर्भात परिसरातील नागरिकांना विचारणा केली असता, गेल्या तीन -चार महिन्यापूर्वी या कामाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली. या रोडच्या कामामुळे चुनाभट्टी येथील रहिवाशांना फेऱ्याने ये-जा करावी लागते.