निवडणुकीनंतरही लोकप्रतिनिधी लोकांशी जुळलेला असावा
By Admin | Updated: October 12, 2014 01:19 IST2014-10-12T01:19:20+5:302014-10-12T01:19:20+5:30
निवडणुकीत सरकार बनते अन् बदलते. तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत व्यक्ती महत्त्वाची असते. उमेदवार असा असावा की जो निवडून आल्यानंतरही जनतेशी जुळून राहील,

निवडणुकीनंतरही लोकप्रतिनिधी लोकांशी जुळलेला असावा
राष्ट्रीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांचे मत
नागपूर : निवडणुकीत सरकार बनते अन् बदलते. तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत व्यक्ती महत्त्वाची असते. उमेदवार असा असावा की जो निवडून आल्यानंतरही जनतेशी जुळून राहील, जनतेला तो आपलासा वाटेल. अनिस अहमद हे असेच व्यक्तिमत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय सकल जैन समाजाचे अध्यक्ष व खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
रजवाडा पॅलेस येथे मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार माजी मंत्री अनिस अहमद यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत खा. दर्डा बोलत होते. या वेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री ए. पल्लमराजू, उत्तर प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रिता बहुगुणा जोशी, मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजकुमार पटेल, अ.भा. समितीच्या अल्पसंख्यक सेलचे अध्यक्ष खुर्शीद अहमद, सलीम अहमद, सकल जैन समाजाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल पारेख आदी उपस्थित होते. या वेळी खा. दर्डा पुढे म्हणाले, अल्पसंख्यंक मंत्री असताना अनिस अहमद यांनी जैन समाजाला अल्पसंख्यकांचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यासाठी प्रयत्न केले.
जैन समाजाला अल्पसंख्यक दर्जा दिल्याबद्दल त्यांनी अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी केंद्रीय मंत्री आदित्य जैन यांचे आभार मानले. अनिस अहमद म्हणाले, जैन समाजाने सदैव चांगली कामे केली आहेत. या समाजाने नेहमी काँग्रेसला साथ दिली आहे.
एलबीटीला आम्ही विरोध केला असल्याचे सांगत त्यांनी एलबीटीवर नाराजी व्यक्त केली. एलबीटी रद्द करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव पारित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अतुल कोटेचा यांनी संचालनासह आभार मानले. (प्रतिनिधी)
नागपूरवर लक्ष
उत्तर प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्ष रिता बहुगुणा जोशी म्हणाल्या, नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे. येथे काही अशी महत्त्वाची ठिकाणे व कार्यालये आहेत की ज्यामुळे जगाचे लक्ष नागपूरकडे आकर्षित होते. अनिस अहमद हे धर्मनिरपेक्ष आहेत. या निवडणुकीत नागपूरकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांचा दौरा नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे, अशी टीका करीत मोदी यांनी ‘रॉक स्टार’ची पदवी मिळविण्याशिवाय काय केले, असा सवाल त्यांनी केला. भाजपची ही अशी पहिली निवडणूक आहे की ज्यात त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही व मुख्यमंत्रिपदाचा चेहराही निश्चित झालेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.