मांढळ : नागपूर जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ज्ञानज्याेती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी वग (ता. कुही) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन पाहणी करीत कामाचे मूल्यांकन केले.
शाळा मूल्यांकन समितीमध्ये खंडविकास अधिकारी माणिक हिमाणी, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा समन्वयक किरण भोयर, भिवापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश लेदे यांचा समावेश हाेता. या सदस्यांनी आदर्श शाळेत आवश्यक असलेल्या मूलभूत बाबींची पाहणी केली. त्यांनी शाळेत राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमधील लाेकसहभागावर शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सदस्य तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या.
यावेळी सरपंच सुनीता निंबर्ते, उपसरपंच जितेंद्र मांढरे, ग्रामपंचायत सदस्य विलास कावळे, केंद्रप्रमुख जुनघरे, मुख्याध्यापक बालपांडे, कुही तालुका समन्वयक रूपेश जवादे, भिवापूर तालुका समन्वयक अविनाश मानकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पालक उपस्थित होते.