विदर्भ सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना करा
By Admin | Updated: July 2, 2015 03:23 IST2015-07-02T03:23:06+5:302015-07-02T03:23:06+5:30
विदर्भ विकास मंडळावर नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांमध्ये महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, ...

विदर्भ सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना करा
नागपूर : विदर्भ विकास मंडळावर नुकत्याच झालेल्या नियुक्त्यांमध्ये महिला, अनुसूचित जाती, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी यांचे प्रतिनिधित्व नसणे आणि संस्कृतीवर आधारित विकासाचा विचार करण्याचा पायंडा विदर्भ विकास मंडळाची ‘विदर्भाचा संस्कृती आधारित विकास’ ही समिती नेमून पाडला गेला.
या संकल्पनेला बळ देण्यासाठी या मंडळावर संस्कृतीशी संबंध असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक होणे अपेक्षित आहे. पण तसे काहीही न झाल्याने विदर्भ सांस्कृतिक आघाडीने असंतोष व्यक्त केला आहे.
राज्याचा संस्कृतीसंबंद्ध विकास होण्याच्या दृष्टीने आघाडीने गेल्या तीन वर्षांच्या अभ्यासातून अनेक अपेक्षा, सूचना आणि निवेदने शासनाकडे पाठविली आहे. विदर्भाचा सांस्कृतिक अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भ सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना करावी आणि महामंडळावर संस्कृतीचा अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राज्यपाल सी. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सारेच वास्तव आणून दिले आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. शासनाने या बाबीचा गंभीर विचार करण्याची मागणी करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)