कट रचूनच युगची हत्या
By Admin | Updated: May 6, 2016 02:48 IST2016-05-06T02:48:27+5:302016-05-06T02:48:27+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयामध्ये घटनाक्रमावर प्रकाश टाकून आरोपींनी युगची हत्या कट रचून केली होती, असे स्पष्ट केले.

कट रचूनच युगची हत्या
हायकोर्टाचा निष्कर्ष : निर्णयात घटनाक्रमावर टाकला प्रकाश
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णयामध्ये घटनाक्रमावर प्रकाश टाकून आरोपींनी युगची हत्या कट रचून केली होती, असे स्पष्ट केले.
आरोपी राजेश हा डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. एक दिवस तो राजेश हाताळीत असलेल्या संगणकावर गेम खेळत बसला होता. यावरून राजेशने युगला थापड मारली होती. परिणामी डॉ. चांडक यांनी राजेशला रागावून यापुढे अशी चूक केली तर खबरदार, असे बजावले होते. याशिवाय राजेश रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसूल करीत होता. यासंदर्भात अनेक रुग्णांनी डॉ. चांडक यांच्याकडे तक्रार केली होती. यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला कामावरून काढून टाकले होते.
अन् अश्रू झाले अनावर
गुरुवारी निर्णय येणार हे आधीच माहीत असल्यामुळे युगचे वडील डॉ. मुकेश चांडक, त्यांचे नातेवाईक व वकील न्यायालयात मोठ्या संख्येत उपस्थित होते. यामुळे न्यायालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती. न्यायालयाने दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम करीत असल्याचे सांगताच डॉ. चांडक यांना अश्रू अनावर झाले. त्यांना स्वत:ला सावरता आले नाही. त्यांना थोड्या वेळासाठी भोवळ आली. नातेवाईकांनी पाणी दिल्यानंतर ते शांत झाले.
याचा राग राजेशच्या मनात होता. त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. राजेशला डॉ. चांडक यांच्या घरातील सर्व परिस्थिती माहीत होती. युग कधी शाळेत जातो. शाळेतून कधी परत येतो हे त्याला माहीत होते. राजेशकडे डॉ. चांडक यांच्या रुग्णालयाचा लाल रंगाचा टी-शर्ट होता. कुणालाही शंका येऊ नये म्हणून हा टी-शर्ट त्याने अरविंदला घालायला दिला. घटनेच्या दिवशी आरोपी युगच्या घरापुढे उभे राहिले. अरविंद रुग्णालयाचा टी-शर्ट घालून असल्यामुळे कुणालाही तो बाहेरचा व्यक्ती असल्याचा संशय आला नाही. राजेश थोडा पुढे उभा होता. युग शाळेच्या बसमधून खाली उतरताच अरविंदने त्याला बोलावले. रुग्णालयात जायचे असल्याचे सांगितल्यामुळे युग त्याच्या दुचाकीवर बसला. काही अंतरावरून राजेशही गाडीवर बसला. यानंतर आरोपींनी युगला कोराडी रोडने निर्जन ठिकाणी नेले.
तेथे त्याची हत्या केली. शवविच्छेदन अहवालात युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ओळख पटू नये म्हणून आरोपींनी युगच्या अंगातील टी-शर्ट काढून टाकला.
युगचा मृतदेह पुलाखालील रेतीमध्ये पुरला व डोक्यावर मोठा दगड ठेवला. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता यानंतर चांडक यांना खंडणीसाठी दोन वेळा फोन केले. आरोपींनी युगच्या अपहरणासाठी तिसऱ्या व्यक्तीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्या व्यक्तीने या गुन्ह्यात सहभागी होण्यास नकार दिला.