उमरेड येथे ८० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:56+5:302021-04-20T04:08:56+5:30
उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती आणि सामाजिक सेवाभावी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून उमरेड येथे ८० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज ...

उमरेड येथे ८० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज
उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती आणि सामाजिक सेवाभावी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून उमरेड येथे ८० बेडचे कोविड केअर सेंटर सज्ज होत आहे. स्थानिक नूतन आदर्श महाविद्यालयात येत्या दोन दिवसांत ही सुविधा सुरू होणार असून, यासाठी नगरपालिका, महसूल विभाग, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत या कोविड सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता.
आ. राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर फलके, नगरसेवक सतीश चौधरी, सुरेश चिचमलकर, डॉ. मुकेश मुदगल, उमेश हटवार आदींनी विविध प्रश्न आणि समस्यांकडे लक्ष वेधले होते. नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुद्धा सुविधा राहणार असून, अन्य सुविधांकडेही गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे.
सध्या स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये काही उणिवा आहेत. नूतन आदर्श महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर जुने कोविड सेंटर या नवीन ठिकाणी स्थानांतरित करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी स्वखर्चातून याठिकाणी ५० बेडची व्यवस्था केली असून अन्य सामाजिक कार्यकर्तेसुद्धा मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.
....
५० जणांसाठी स्वतंत्र सुविधा
उमरेडच्या नवीन कोविड केअर सेंटरमध्ये ८० बेड व्यतिरिक्त अन्य ५० जणांसाठी व्यवस्था होईल, अशी स्वतंत्र सुविधा केली जाणार आहे. ज्यांना थोडाफार कमी त्रास उद्भवताे, अशा रुग्णांकरिता ही व्यवस्था नूतन आदर्श महाविद्यालयात केली जाणार आहे.
...
नूतन आदर्श महाविद्यालयात सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरची जागा उत्तम आहे. ग्रामीण रुग्णालयसुद्धा काही अंतरावरच आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे, यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती प्रयत्नरत राहणार आहे.
- विजयलक्ष्मी भदोरिया,
नगराध्यक्ष, नगर परिषद, उमरेड
....
कोरोना रुग्णांची होत असलेली गैरसोय यामुळे सर्वच चिंतित आहेत. कोविड केअर सेंटरसाठी आमच्या महाविद्यालयाची निवड केल्या गेली, ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत.
- डॉ. श्रुती सोरते, अध्यक्ष, आयडीयल एज्युकेशन सोसायटी, उमरेड.