हजारांमध्ये सहा जणांना मिरगीचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST2021-02-08T04:07:54+5:302021-02-08T04:07:54+5:30
- आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन नागपूर : अपस्मार म्हणजे मिरगी हा मेंदूचा एक सामान्य आजार आहे. उपचारामुळे त्याला प्रतिबंधित करणे ...

हजारांमध्ये सहा जणांना मिरगीचा आजार
- आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन
नागपूर : अपस्मार म्हणजे मिरगी हा मेंदूचा एक सामान्य आजार आहे. उपचारामुळे त्याला प्रतिबंधित करणे शक्य आहे. भारतात हजार लोकांमध्ये मिरगीचे सहा रुग्ण आढळून येतात. दरवर्षी एक लाख लोकसंख्येत ५० नव्या रुग्णांची भर पडते. या आजाराचा पुरुष आणि स्त्रियांवर सारखाच प्रभाव पडतो. सुमारे ७५ टक्के रुग्णांमध्ये अपस्मारविरोधी औषधांद्वारे चांगले नियंत्रण मिळवता येते. उर्वरित २५ टक्के रुग्णांपैकी जवळपास ५० टक्के रुग्णांमध्ये अपस्मार, शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो, असे ‘इंडियन अॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन पाळला जातो. या दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. मूर्ती म्हणाले, अपस्माराबद्दल अनेक चुकीच्या संकल्पना आणि कल्पना आहेत. काही जणांचा विश्वास आहे की, अपस्मार हा एक संसर्गजन्य रोग आहे. अपस्मार हा भारतामध्ये आणि बऱ्याच गरीब देशांमध्ये भयंकर कलंक आणि भेदभावाशी संबंधित आहे, यामुळे या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे.
-मिरगीविरुद्ध एकत्र काम करण्याची गरज - डॉ. मेश्राम
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, अपस्मार असलेल्या लोकांबद्दल समाजाचे दृष्टिकोन नेहमीच नकारात्मक राहिला आहे. अपस्मार असलेल्या रुग्णांविषयी समाजाच्या या वृत्तीमध्ये कठोर बदल आवश्यक आहे. अपस्मार असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चांगल्या आयुष्याची संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे.
- मिरगीबाबत गैरसमज दूर होणे आवश्यक - डॉ. श्रीनिवास
आयएएनचे माजी अध्यक्ष डॉ. एच. व्ही. श्रीनिवास म्हणाले, अपस्माराबाबत अनेक गैरमसज आहेत. यामुळे या आजाराच्या रुग्णाला शिक्षण, खेळ, नोकरी, विवाह आदी क्षेत्रांत अडचणी निर्माण होतात. हे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. कोलकात्यातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. गौतम गांगुली म्हणाले, या आजाराच्या रुग्णाला अयोग्य पद्धतीची वागणूक मिळत असल्याने त्याचा परिणाम त्याच्या मनावर होतो. आयुष्यात दीर्घकाळ नैराश्य आणि तणावात जगतो.
- वाढत्या वयानुसार अपस्माराचा धोकाही वाढतो - डॉ. अग्रवाल
लखनौच्या केजीएमसी न्यूरोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. अतुल अग्रवाल
यांनी सांगितले, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश हे मिरगीच्या उच्च शक्यतांशी संबंधित आहे. मानसशास्त्रज्ञ कॅरोल डिसोझा यांनी सांगितले, अपस्मार असलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे योग्य समुपदेशन होणे उपचाराएवढेच महत्त्वाचे ठरते. न्यूरोलॉजीचे प्राध्यापक डॉ. परमप्रीतसिंग यांनी सांगितले, अपस्मारासारखी लक्षणे असलेले आणखी काही आजार आहेत. यामुळे वेळीच निदान होणे गरजेचे असते. भारतीय एपिलेप्सी असोसिएशनचे सचिव डॉ. बी राजेंद्रन म्हणाले, अपस्माराचा कलंक सार्वत्रिक असला तरी स्त्रियांवर त्याचा प्रभाव चिंताजनक आहे.