प्रवेशबंदी कायम की हटली?
By Admin | Updated: July 8, 2014 01:16 IST2014-07-08T01:16:51+5:302014-07-08T01:16:51+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे,

प्रवेशबंदी कायम की हटली?
व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा : अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५० महाविद्यालयांवर लावलेल्या प्रवेशबंदीच्या मुद्यावर सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रवेशबंदी हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला.
परंतु बैठकीनंतर मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये या मुद्यावरून किती संभ्रम आहे याचे प्रत्यंतर आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी प्रवेशबंदी हटलेली नाही, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे बीसीयूडी संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र ज्या महाविद्यालयांनी नवीन निकषांनुसार प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. कुलगुरूंचे ‘ना’ आणि डॉ. कोमावारांचे ‘हा’ यामुळे नेमकी प्रवेशबंदी हटली की नाही, यासंदर्भात संभ्रम वाढीस लागला आहे.
एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या २५० महाविद्यालयांवर ७ जून २०१३ रोजी विद्यापीठाने प्रवेशबंदी लावली होती. त्यानंतर विद्यापीठात गेल्या वर्षभरापासून सातत्याने या मुद्यावर चर्चा, आंदोलने सुरू आहेत. शिवाय संबंधित प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रवेशबंदीसंदर्भात चर्चा झाली.
ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांची नावे प्रवेशबंदीच्या यादीतून हटली पाहिजे, असा सूर या बैठकीत निघाला. जवळपास ४३ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे यासंदर्भातील शपथपत्र जमा केले असल्याने त्यांची नावे यादीतून वगळली पाहिजे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.
परंतु संबंधित मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाला याची माहिती द्यावी लागेल, असे सदस्यांनी सुचविले.
व्यवस्थापन परिषदेची बैठक आटोपल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यांनी अद्याप प्रवेशबंदी हटविण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यानंतर ‘बीसीयूडी’ संचालक डॉ. श्रीकांत कोमावार यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. प्रवेशबंदीची ही यादी २०१३-१४ या सालासाठी होती. शिवाय २०१४-१५ सालासाठीच्या नवीन निकषांनुसार ज्या महाविद्यालयांनी प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे ते विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
डॉ. कोमावार यांना यासंदर्भात वारंवार विचारणा केल्यावर त्यांनी संबंधित महाविद्यालयांची प्रवेशबंदी हटविण्यात आली आहे, हे मान्य केले. यावेळी काही संस्थाचालकदेखील उपस्थित होते, हे विशेष. प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)