अभियांत्रिकी प्रवेश : जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:15 IST2018-06-13T22:15:19+5:302018-06-13T22:15:39+5:30
अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला असला तरी, आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्जाची निश्चिती करता आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. ही अट शिथिल करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील सरकारला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सरकार विद्यार्थ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभियांत्रिकी प्रवेश : जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबितच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन आठवडा झाला असला तरी, आरक्षित प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही अर्जाची निश्चिती करता आलेली नाही. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थी कोंडीत सापडले आहेत. ही अट शिथिल करण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील सरकारला पत्र लिहिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सरकार विद्यार्थ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली. १९ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल करायचे आहेत; शिवाय याच कालावधीत त्यांना ‘एफसी’वर (फॅसिलिटेशन सेंटर) जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून अर्जनिश्चिती करायची आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन सहा दिवस झाले असले तरी ‘एफसी’वर अद्यापही हवे त्या प्रमाणात विद्यार्थी आलेले नाहीत. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज दाखल केल्यानंतर ज्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, त्यात जात वैधता प्रमाणपत्राचादेखील समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी शासकीय यंत्रणेकडे अर्ज केला आहे. मात्र त्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. अशास्थितीत शासनाने मागील वर्षीप्रमाणे हमीपत्राच्या आधारावर तीन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयामधील मुख्यालयातील सूत्रांशी संपर्क केला असता, आमच्याकडेदेखील पालक-विद्यार्थ्यांनी अडचणी मांडल्या आहेत. शासनाला याबाबत कळविण्यात आले असून शासनपातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासनाला लवकर घ्यावा लागणार निर्णय
प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार अर्जनिश्चितीचा अखेरचा दिनांक १९ जून हा आहे. त्यासाठी अवघे सहा दिवस उरले असून, मध्ये दोन सुट्या आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, शासनाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे.