रिलायन्समुळे लघु व मध्यम उद्योजकांमध्ये उत्साह

By Admin | Updated: September 18, 2015 02:46 IST2015-09-18T02:46:16+5:302015-09-18T02:46:16+5:30

अनिल धीरूभाई अंबानी समूहाने मिहान-सेझमध्ये धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विदर्भातील मध्यम उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

The enthusiasm among small and medium enterprises due to Reliance | रिलायन्समुळे लघु व मध्यम उद्योजकांमध्ये उत्साह

रिलायन्समुळे लघु व मध्यम उद्योजकांमध्ये उत्साह

मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्क : विदेशी कंपन्यांचेही आगमन
नागपूर : अनिल धीरूभाई अंबानी समूहाने मिहान-सेझमध्ये धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विदर्भातील मध्यम उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीनंतर लघु व मध्यम स्तरातील कंपन्यांना चांगले दिवस येतील, असा उद्योजकांना विश्वास आहे.
रिलायन्स डिफेन्स अ‍ॅण्ड एअरोस्पेस अंतर्गत संरक्षण व हवाई सामग्री तयार करण्यासाठी एकाचवेळी १२ कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला प्रकल्प मिहान-सेझमध्ये सुरू होण्याच्या घोषणेनंतर अन्य आघाडीच्या कंपन्यांनी मिहानकडे धाव घेतली असून जागेसंदर्भात बोलणी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. या प्रकल्पासोबत विदेशी कंपन्यांचेही मिहानमध्ये आगमन होणार असल्याचे अधिकारी म्हणाले. मिहान-सेझमध्ये २८९ एकर जमिनीवर ६५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करून अनिल धीरूभाई अंबानी समूहाने प्रकल्पाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.
अनिल अंबानी यांनी नागपुरात प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर मिहानमध्ये विकासाचे वारे वाहू लागले आहेत. शिवाय या कंपनीवर आधारित उपकंपन्यांनाही सुगीचे दिवस येणार आहे. समूहाने प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा एमएडीसीकडे सादर केला आहे.
त्यात युरोकॉप्टर ही एअरबस समूहातील हेलिकॉप्टर निर्मिती करणारी कंपनी, रशियाची हेलिकॉप्टर तयार करणारी कामोव्ह कंपनी तसेच अमेरिकन सिकोर्स्की कंपनीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग या प्रकल्पात राहणार असल्याचे आराखड्यात नमूद केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The enthusiasm among small and medium enterprises due to Reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.