नागपूरमध्ये वकिली केलेल्या पाच न्यायामूर्तींच्या नियुक्तीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:08+5:302021-05-30T04:08:08+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट, न्या. मुकुलिका जवळकर व ...

Enjoyed the appointment of five justices to advocate in Nagpur | नागपूरमध्ये वकिली केलेल्या पाच न्यायामूर्तींच्या नियुक्तीचा आनंद

नागपूरमध्ये वकिली केलेल्या पाच न्यायामूर्तींच्या नियुक्तीचा आनंद

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्या. अनिल किलोर, न्या. वीरेंद्रसिंग बिष्ट, न्या. मुकुलिका जवळकर व न्या. नितीन बोरकर यांच्यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नागपुरात जडणघडण झालेल्या या पाचही अतिरिक्त न्यायमूर्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे सेवेत कायम करण्यात आले आहे.

नागपुरातील विधिज्ञ त्यांच्या सखोल विधी ज्ञानाकरिता संपूर्ण देशात ओळखले जातात. आतापर्यंत अनेक विधिज्ञांनी विविध मोठमोठ्या पदांवर कार्य करून नागपूरचा मान सतत उंचावत नेला. त्यात सदर पाच विधिज्ञांचाही समावेश आहे. न्या. घरोटे व न्या. किलोर यांची २३ ऑगस्ट २०१९, तर न्या. बिष्ट, न्या. जवळकर व न्या. बोरकर यांची ५ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच सेवेत कायम करण्यात आले आहे. हे पाचही विधिज्ञ येत्या १ जून रोजी कायम न्यायमूर्ती म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील या पाचसह एकूण १० अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्यात आले आहे. यासंदर्भात २७ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. घरोटे यांनी नागपूरमध्ये ३३ वर्षे वकिली केली. त्यांनी वडील गुणवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. ते नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे सचिव होते. ते मूळ नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

मूळ अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले न्या. किलोर यांनी अ‍ॅड. अरविंद बडे व अ‍ॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. दरम्यान, त्यांनी नागपूरमध्ये २७ वर्षे वकिली केली. ते हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढताना विविध ज्वलंत विषयांवर जनहित याचिका दाखल केल्या होत्या.

न्या. बिष्ट यांचा जन्म जालना येथील असून त्यांनी नागपूर येथून विधी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. दरम्यान, त्यांची कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते एकेक पायरी वर चढत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. तत्पूर्वी त्यांनी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे व्यवस्थापक आणि विधी व न्याय विभागाचे सहसचिवपदी कार्य केले.

न्या. जवळकर या नागपूरकर असून त्यांनी येथे १९८९ ते २००८ पर्यंत वकिली केली. २००८ मध्ये त्यांची जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अमरावती, भंडारा, मुंबई इत्यादी शहरांतील न्यायालयांमध्ये न्यायदानाचे कार्य केले. त्या हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या सदस्य व विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या सचिव होत्या.

न्या. बोरकर हे मूळ गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचे वडील रुद्रसेन बोरकर तेथील प्रसिद्ध वकील आहेत. न्या. बोरकर यांनी आधी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. न्यायिक अधिकारी झाल्यानंतर त्यांनी विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्य केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते चंद्रपूरमध्ये प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश होते.

Web Title: Enjoyed the appointment of five justices to advocate in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.