बसस्थानकसमोरील खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

By Admin | Updated: July 23, 2014 00:52 IST2014-07-23T00:52:33+5:302014-07-23T00:52:33+5:30

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक आणि शेतकरी भवनदरम्यान ९ जून रोजी दिवसाढवळ्या दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या सूरज केसरीलाल जयस्वाल याच्या खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

Engineering students in murder case next to bus station | बसस्थानकसमोरील खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

बसस्थानकसमोरील खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक आणि शेतकरी भवनदरम्यान ९ जून रोजी दिवसाढवळ्या दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या सूरज केसरीलाल जयस्वाल याच्या खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी असल्याची पोलिसांची माहिती असून या विद्यार्थ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुळे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
पवन चौधरी, असे या आरोपीचे नाव असून तो म्हाळगीनगरच्या गजानन अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
प्राप्त माहितीनुसार अनुराग ऊर्फ अन्या विजय वाघमारे रा. ज्ञानेश्वरनगर, शुभम ऊर्फ पेठ्या सुरेश गजघाटे , आकाश ऊर्फ टिंग्या किसन चव्हाण , स्वप्नील ऊर्फ बाबा बापूराव भोयर सर्व रा. सावित्रीबाई फुलेनगर, शेख सलमान शेख मेहबूब , शेख शाहरुख ऊर्फ भुऱ्या शेख मेहबूब दोन्ही रा. ताजनगर, शुभम शरद चौधरी रा. न्यू बाभुळखेडा, मिर मिश्रा, चिंटू ऊर्फ चिंट्या वाघमारे आणि रुषभ सावंत यांनी तलवारी , दंड्याने हल्ला करून तसेच फुटपाथच्या सिमेंटच्या दगडाने डोके ठेचून सूरजचा खून केला होता.
२३ वर्षीय सूरज जयस्वाल हा हिंगण्याचा रहिवासी होता आणि क्रिकेट सट्ट्याची वसुली करायचा. तो पवन चौधरी याला वारंवार भेटून २७ हजाराची मागणी करीत होता. एक-दोन वेळा तो पैशासाठी पवनच्या घरीही गेला होता. ही बाब पवनच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पवनला हटकलेही होते. सूरज हा आपणाला वारंवार पैसे मागतो, परंतु कशासाठी मागतो हे आपणाला माहीत नाही, असेही त्याने वडिलांना सांगितले होते. पुढे पवन याने सूरजला पैशाबाबत समझोता करण्यासाठी ८ जून रोजी रेशीमबाग येथे बोलावले होते. परंतु त्या दिवशी खुद्द पवन आणि सूरज हे रेशीमबाग येथे गेलेच नव्हते.
त्यामुळे त्याने ९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकरीभवनस्थित शर्मा यांच्या दुकानात पैशाबद्दल बातचित करण्यासाठी बोलावले होते. शर्मा हे पवनच्या वडिलाचे मित्र आहेत. सूरज आपणास विशिष्ट वेळी शर्मा यांच्या दुकानात भेटणार असल्याचे पवन याने रुषभ सावंत याला सांगितले होते.
दरम्यान, सूरज जयस्वाल याने आपलाच एक मित्र या प्रकरणातील फिर्यादी अक्षय हरिभाऊ दुपारे याची मोटरसायकल आणि मोबाईल गहाण ठेवला होता. त्यामुळे अक्षय हा त्याला आपल्या वस्तू परत मागत होता. घटनेच्या दिवशी त्याने पवनकडून पैसे मिळणार असून मोटरसायकल व मोबाईल परत करतो, असे सांगून त्याला आपल्यासोबत नेले होते.
दरम्यान, सूरज हा शर्मा यांच्या दुकानात येणार असल्याची खबर रुषभ याने आपल्या अन्य साथीदारांना दिली होती. त्यामुळे या सर्व आरोपींनी शर्मा यांच्या दुकानासमोर दबा दिला होता. सूरज हा पवनसोबत पैशाची बोलणी करण्यास येताच आरोपींनी त्याला गराडा घातला आणि सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. या खुनाचा कट पवनने रचल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला आरोपी बनवले. अटकेच्या भीतीने त्याने ३० जूनला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Engineering students in murder case next to bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.