लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/हिंगणा : उपराजधानीतील महिला व तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला आहे. हिंगणा मार्गावरील ओबीसी मुलींच्या शासकीय वसतिगृहात मध्यरात्री शिरून झोपलेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी तिचा फोन हिसकावून पळ काढला. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून मोठमोठे दावे करत विविध मोहिमा राबविण्यात येतात. मात्र, त्याचा खरोखरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसतो का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
हिंगणा मार्गावर संबंधित वसतिगृह आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने गेल्यावर्षी ही इमारत भाडेतत्त्वावर घेतली होती. तेथील दोन माळ्यांवर हे वसतिगृह सुरू करण्यात आले. तेथे ६४ विद्यार्थिनींसाठी जागा आहे. २२ जुलै रोजी मध्यरात्री तीन वाजताच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लोखंडी जिन्यावरून दोन अज्ञात आरोपी दुसऱ्या माळ्यावर पोहोचले. वसतिगृहातील एका खोलीला कडीच नसल्याने नाईलाजाने विद्यार्थिनीने दरवाजा फक्त टेकवून ठेवला होता. आरोपी तिच्या खोलीत शिरले व तिथे तिचा मोबाइल उचलला. त्यानंतर एका आरोपीने तिला स्पर्श केला. त्या स्पर्शाने विद्यार्थिनी जागी झाली. समोर तरुण पाहून ती घाबरली. मात्र तिने हिंमत एकवटून आरडाओरड केली. त्यामुळे दोन्ही आरोपींनी पळ काढला. तिचा आवाज ऐकून वसतीगृहातील इतर विद्यार्थिनी तिथे पोहोचल्या. या प्रकाराची माहिती वसतिगृहाच्या वॉर्डनला देण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.
वॉर्डनच्या भूमिकेमुळे संतापविद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहातील वॉर्डनने अगोदर केवळ मोबाइल चोरी गेल्याचीच तक्रार करा असे सांगितले. मात्र, विद्यार्थिनीने कुटुंबीयांना या प्रकाराची फोनवरून माहिती दिली. अखेर दुसऱ्या दिवशी छेडखानीची माहिती वॉर्डनने पोलिसांना दिली. आश्चर्याची बाब म्हणजे ६४ विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था असलेल्या वसतीगृहात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नाही. तसेच, सीसीटीव्हीदेखील लावण्यात आलेले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे दरवाजे बंद ठेवण्यासाठी केवळ दोरीचा वापर करण्यात येत होता.
ना - सीसीटीव्ही.. ना सुरक्षा रक्षकनऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या शासकीय वसतिगृहात मुलींच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही उपाय नाही. येथे सीसीटीव्ही नाहीत. सुरक्षा रक्षकही नाही. इतक्या त्रुटी असूनही शासनाचे हे वसतिगृह सुरू कसे, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. वसतिगृहाचे कंत्राट देताना शासकीय नियमांची संबंधितांना जाणीव प्रशासनाने करून दिली नाही का?
पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हानसंबंधित बसतीगृह हे व्यावसायिक इमारतीत आहे. दिवसभर तेथील आस्थापनांमध्ये अनेक तरुण येत असतात. त्यामुळे मागील बाजूला असलेल्या आपत्कालीन जिन्यात वर दरवाजा नाही, याची अनेकांना माहिती आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आहे. परिसरातील सीसीटीव्ही कैमेन्यांच्या माध्यमातून शोध सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार गोकुल महाजन यांनी दिली.