भांडे घासून मुलीला केले इंजिनीअर
By Admin | Updated: March 8, 2015 13:15 IST2015-03-08T02:24:50+5:302015-03-08T13:15:23+5:30
घरी सारेच प्रतिकूल होते ... कष्टाला पर्याय नव्हता़, पण ती हरली नाही़ गरिबीचा हा भोगवटा आपल्या मागे आपल्या मुलांनाही भोगावा लागू नये म्हणून तिने डोक्यावरचा पदर कंबरेला खोसला आणि ...

भांडे घासून मुलीला केले इंजिनीअर
वीरेंद्रकुमार जोगी नागपूर
घरी सारेच प्रतिकूल होते ... कष्टाला पर्याय नव्हता़, पण ती हरली नाही़ गरिबीचा हा भोगवटा आपल्या मागे आपल्या मुलांनाही भोगावा लागू नये म्हणून तिने डोक्यावरचा पदर कंबरेला खोसला आणि अखंड परिश्रमाच्या बळावर आपल्या मुलीला आज इंजिनीअर केले़ स्त्रीशक्तीचे आदर्श उदाहरण असलेल्या बेबी वानखेडे यांची ही साहसकथा आहे़
परिस्थितीने अत्यंत दीन असलेल्या बेबी लग्नापूर्वी बेकरीत कामाला होत्या तर पती हॉटेलात काम करीत होते. दोघांच्याही तुटपुंज्या कमाईतून कसाबसा संसार चालत होता. मुलीच्या जन्माने जबाबदारी वाढलीच, अशातच दोन मुलांचाही जन्म झाला. एकट्या नवऱ्याच्या कमाईवर भागत नसल्याने बेबीने घरकामाला सुरुवात केली. घरच्या कमाईत हातभार लागला. दहावी-बारावीत चांगले गुण मिळविलेल्या आपल्या मुलीने मोठे व्हावे असे वाटत होतेच. मेडिकलमध्ये पुरेसे पैसे नसल्याने प्रवेश घेता आला नाही. याचे शल्य आजही बेबी यांच्या मनात आहे. इंजिनीअर झालेल्या आपल्या मुलीला पाहिल्यावर आजही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान बेबीच्या डोळ्यातून ओझरते. आपल्या मुलीने आपले दिवस पालटवले, असे बेबी यांनी सांगितले. मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेल्या पैशातून झोपडीचे रू पांतर घरात झाले. मुलीच्या लग्नाची जबाबदारी मुलांनी स्वीकारली आहे. आम्ही आमच्या आयुष्यात उपसलेले कष्ट कुणाच्याच आयुष्तात येऊ नयेत. मुलगी झाली तेव्हा तिचे पालनपोषण व लग्न कसे होईल, असा विचार नेहमीच करायचे. आता माझ्या मुलीनेच माझे भाग्य पालटले आहे, असे बोलताना बेबी वानखेडे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरतात.