ऊर्जा क्षेत्रातील संशोधन प्रयोगशाळा नागपुरात
By Admin | Updated: July 12, 2015 03:10 IST2015-07-12T03:10:56+5:302015-07-12T03:10:56+5:30
केंद्र सरकारच्या विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळेसाठी धुटी येथे ४९.०४ हेक्टर जागा राज्य शासनाने मंजूर केली आहे.

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन प्रयोगशाळा नागपुरात
नागपूर : केंद्र सरकारच्या विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळेसाठी धुटी येथे ४९.०४ हेक्टर जागा राज्य शासनाने मंजूर केली आहे. एकूण ५०० कोटीचा हा प्रकल्प असून केंद्रीय ऊर्जामंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते या संस्थेच्या कामाचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाच्या अधिपत्याखालील संशोधन संस्थेने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन व परिक्षण प्रयोगशाळा नागपुरात स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागपुरात जागेची मागणी केली होती. संस्थेने केलेल्या मागणीनुसार नागपूर ग्रामीण येथील धुटी येथे अनुक्रमे ३७.१९ हेक्टर, २.४३ हेक्टर आणि ९.४२ हेक्टर अशी एकूण ४९.०४ हेक्टर जागा शासनाने संस्थेसाठी मंजूर केली आहे. यासंबंधातील शासन निर्णय सुद्धा गेल्या २ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार धुटी येथील शासकीय जमीन नाममात्र १ रुपया दराने ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने नियमित अटी व शर्तीवर तसेच खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या केंद्र शासनाच्या स्वायत्त संस्थेस मंजूर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लागेल आणि ऊर्जा क्षेत्रात नवनवीन संशोधनाला सुरुवात होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय ट्रीपल आयटीसाठी वारंगा येथे ३९.९६ हेक्टर आणि नॅशनल लॉ स्कूलसाठी कारडोंगरी येथे २४.२९ हेक्टर जागा मंजूर करण्यात आली असल्याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पत्रपरिषदेला महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, गिरीश जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्याच्या जागेचा प्रश्न १५ दिवसात निकाली
नागपुरातील अनेक पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत आहेत. ही पोलीस ठाणे स्वत:च्या जागेत उभी राहावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असून येत्या १५ दिवसात जागेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. यासंबंधात शुक्रवारी नासुप्र अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली त्यात उपरोक्त विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रतापनगर, हुडकेश्वरसह शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या जागेच्या प्रश्नावर चर्चा झाली आहे. १५ दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल. मानकापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन येत्या १८ तारखेला करण्यात येणार आहे. नागपूर शहरातील वाढलेली सीमा लक्षात घेता बेसा व बेलतरोडी हे नवीन पोलीस ठाणे तयार करणे आणि कामठी-बुटीबोरी व हिंगणा पोलीस ठाणे नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाशी जोडण्याचा प्रस्ताव असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखरर बावनकुळे यांनी सांगितले.