अंतर्गत संघर्ष आधी संपवा!
By Admin | Updated: April 1, 2017 02:59 IST2017-04-01T02:59:48+5:302017-04-01T02:59:48+5:30
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष एकत्र आला. शेतकऱ्यांसाठी आता रखरखत्या उन्हात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला.

अंतर्गत संघर्ष आधी संपवा!
संघर्ष यात्रेतही गटबाजीचे दर्शन : कसा देणार भाजपाशी लढा ?
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष एकत्र आला. शेतकऱ्यांसाठी आता रखरखत्या उन्हात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. यात्रेला नावही ‘संघर्ष यात्रा’ असे दिले. काँग्रेसने त्यासाठी पुढाकार घेतला. ही चांगली बाब आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने उचललेले हे पाऊल शेतकऱ्यांसह पक्षासाठीही फायद्याचे आहे. मात्र, या यात्रेत एकूणच नियोजनाचा अभाव, स्थानिक राजकारण, त्यातून निर्माण झालेले अंतर्गत हेवेदावे, रुसवेफुगवेही पहायला मिळत आहे. अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आणणाऱ्या या बाबींमुळे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला निघालेला पक्ष काहीसा दुबळा होत आहे, यावर काँग्रेसजनांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
विरोधकांनी संघर्ष यात्रेचा प्रवास एसी मर्सिडीज बेन्झ बसमधून सुरू केला. या एसी प्रवासामुळे शेतकऱ्यांच्या घामाच्या धारा विरोधकांना कळणार कशा, अशी टीका करण्याची आयती संधी भाजपाला मिळाली. अर्थात रखरखत्या उन्हात काँग्रेस- राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उघड्या टपावर बसून प्रवास करणे अपेक्षित नाही. ते सयुक्तिकही ठरणार नाही. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्राही एसी बसमधूनच होती. पण तो आता इतिहास झाला आहे. काँग्रेसने संघर्षाच्या या प्रवासात काहीसा साधेपणा ठेवला असता तर टीकाकारांनाही संधी मिळाली नसती व यात्रा अधिक परिणामकारक ठरली असती.
यात्रा ज्या जिल्ह्यात जात आहे तेथे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून येत आहे. चंद्रपूर, वर्धेत तसेच झाले. नागपुरात तर परिसिमा गाठली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यात्रेत सहभागी झाले नाहीत. संघभूमी असलेल्या गडकरी- फडणवीसांच्या नागपुरात काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असताना राज्यभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांना नागपुरातील दुफळीचे विदारक चित्र पहायला मिळावे ही शोकांतिका आहे.
हिवाळी अधिवेशनावर लाखोंचा मोर्चा काढणारी नागपूर शहर काँग्रेस संघर्ष यात्रेपासून चार हात लांबच राहिली. व्हेरायटी चौकातील कार्यक्रमात शहर अध्यक्ष विकास ठाकरे आलेच नाहीत. यात्रेची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांनी शहर काँग्रेसला विश्वासात घेतले नसेल तर ही बाब अधिकच गंभीर आहे. मात्र, पक्षाची राज्यस्तरीय यात्रा नागपुरात येत असताना निमंत्रण, मान सन्मानाची अपेक्षा न करता त्यात सहभागी होऊन पक्षाची ताकद दाखविणे हे देखील तेवढेच आवश्यक होते. पक्षातर्फे युद्धपातळीवर एखादी मोहीम राबविताना सर्वांना विश्वासात का घेतले जात नाही, एकमेकांना डावलण्याचे प्रयत्न का होतात, याचाही शोध पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवा. ज्यांना पक्षाच्या मोहिमेत सहभागी व्हायचेच नसेल त्यांना एकदाचे या सर्व प्रकियेतून दूर करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे धाडस देखील नेत्यांना दाखवावे लागेल. त्याशिवाय नेते व कार्यकर्त्यांवर वचक बसणार नाही.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे नागपुरात तीन तास असताना देखील तीन मिनिटांसाठीही व्हेरायटी चौकात पोहचले नाहीत. चव्हाण का आले नाही, या सभेत कुणी गोंधळ घालणार होते का, वादविवाद होणार होते का, असे अनेक प्रश्न चव्हाण यांच्या अनुपस्थितीने निर्माण झाले. अशी शक्यता होती तर ज्येष्ठ नेत्यांनी समन्वय घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. यामुळे किमान कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला नसता व सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आणखी मजबूत झाले नसते. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेत्यांमधील मतभेद टोकाला गेल्याचे पहायला मिळाले. अंतर्गत वादाच्या ठिणगीने पिंपरी-चिंचवड धगधगली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या पराभवातून धडा घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकदिलाने संघर्ष यात्रेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसने निदान आपल्या ‘मित्राचे’ तरी अनुकरण करण्याची गरज आहे. पराभवानेही डोळे उघडणार नसेल तर अशा संघर्ष यात्रा काढण्याचे फक्त कागदोपत्री समाधान मिळेल. वाद असलेल्या घरात पाहुणाही दोन-चार दिवसावर राहत नाही.
इथे तर मतदार राजाचा प्रश्न आहे. तो जळत्या घरात संसार कसा थाटणार ? यावर काँग्रेस नेत्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.