संप ही आंदोलनाची सुरुवात

By Admin | Updated: June 2, 2017 02:32 IST2017-06-02T02:32:12+5:302017-06-02T02:32:12+5:30

शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे.

The end of the agitation begins | संप ही आंदोलनाची सुरुवात

संप ही आंदोलनाची सुरुवात

सरकारने वेळीच दखल घ्यावी : शेतकरी संघटनांतील कार्यकर्त्यांचा सरकारला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरीही संपावर जाऊ शकतात, ही संकल्पनाच वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महराष्ट्रातील ४२ संघटनांचा पाठिंबा आहे. या आंदोलनाने पहिल्याच दिवशी सरकारला घाम फोडला आहे. ही केवळ सुरुवात आहे. सरकारने वेळीच याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते, असा इशारा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

कळमन्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नियमित आवक
महाराष्ट्रात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नागपुरात बाजारपेठांमध्ये काहीही परिणाम दिसून आला नाही. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ कळमना बाजाराचा फेरफटका मारला असता सर्व बाजारपेठांमध्ये शेतकी मालाची आवक नियमितपणे सुरू होती. कळमना धान्य बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव कमलाकर घाटोळे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून सर्व धान्याची आवक कमीच आहे. काही शेतकऱ्यांनी नियमितपणे धान्य बाजारात आणले. नागपूर चिली मर्चंट असोसिएशनचे सचिव संजय वाधवानी म्हणाले, कळमना बाजारात मिरचीचा व्यवहार केवळ सोमवारी होतो. त्यामुळे आंदोलनाचा बाजारात काहीही परिणाम झाला नाही. भाजी बाजाराचे अध्यक्ष नंदकिशोर गौर यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच भाजीपाला बाजारात विक्रीकरिता आणला. याशिवाय कळमन्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, जयपूर येथून भाजीपाला आला. आंदोलन केवळ पश्चिम नागपुरात सुरू आहे. त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे ५० ते १०० एकर जमिनी आहेत. त्यातील बहुतांश शेतकरी आणि नेतेसुद्धा आहेत. ते शेतकी मालाला थेट बाजारात विक्रीसाठी नेतात. त्यांचा आंदोलनात सहभाग असल्यामुळे त्यांनी बाजार समितीत भाजीपाला नेला नाही. त्याची झळ त्या भागातील ग्राहकांना बसली. पण नागपुरात आंदोलनाची झळ पोहोचली नाही. कळमना बाजाराचा उपबाजार कॉटन मार्केट भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांनी भाज्या नेहमीप्रमाणे विक्रीसाठी आणल्या. आंदोलनाचा काहीही परिणाम झालेला नाही, असे फळ आणि भाजीपाला अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी सांगितले. फळे बाजारात नेहमीप्रमाणे फळांची आवक सुरू होती. शेतकरी आंदोलनाचा परिणाम बाजारात दिसला नाही, असे फळे बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: The end of the agitation begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.