धमकीला न जुमानता अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: March 1, 2016 03:07 IST2016-03-01T03:07:57+5:302016-03-01T03:07:57+5:30
आत्मदहनाच्या धमकीला न जुमानता उमरेड रोडवरील ओम स्वीट्स हॉटेलचे अवैध बांधकाम नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी हटविले.

धमकीला न जुमानता अतिक्रमण हटविले
नासुप्रची कारवाई : दिघोरी येथील हॉटेलचे अवैध बांधकाम तोडले
नागपूर : आत्मदहनाच्या धमकीला न जुमानता उमरेड रोडवरील ओम स्वीट्स हॉटेलचे अवैध बांधकाम नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी हटविले.
नासुप्रचे पथकाने अवैध बांधकाम हटविण्याला सुरुवात करताच हॉटेल मालकाने आत्मदहनाची धमकी दिली. यामुळे काहीवेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पथकातील अधिकाऱ्यांनी याची लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार थोड्याच वेळात हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. नतंर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले.
मौजा दिघोरी येथील समर्थ गजानन को-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटीच्या भूखंड क्रमांक १२ येथे लालचंद तिवारी यांनी चार मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यांनी ७६.५० मीटरचे अवैध बांधकाम केले होते. यात कॅन्टीन सुरू केले होते. यासंदर्भात छावा मराठा युवा संघटनेने महापालिकेकडे तक्रार केली होती. परंतु हा भाग नासुप्रकडे येत असल्याने ही तक्रार हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार नासुप्रने हॉटेल मालकाला नोटीस बजावली होती. परंतु त्यानंतरही अतिक्रमण न हटविल्याने पथक घटनास्थळी पोहोचले. बाहेरचे शेड तोडण्यात आले.
उर्वरित अतिक्रमण काढण्याची ग्वाही दिल्याने पथकाने ५० हजारांचा दंड आकारून तिवारी यांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत दिली. ही कारवाई अनिल अवस्थी, भीमराव देशपांडे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी केली. (प्रतिनिधी)