धार्मिक स्थळांचे अतिक्रमण, नागरिकांचा विरोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 22:45 IST2018-08-03T22:42:07+5:302018-08-03T22:45:49+5:30
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरतील अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु असून या कारवाईच्या विरोधात नागरिकही रस्त्यावर उतरले आहे. शुक्रवारीसुद्धा शताब्दीनगर चौकात नागरिकांनी धार्मिक अतिक्रमण पाडण्याला तीव्र विरोध करीत नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाला परत पाठवले.

धार्मिक स्थळांचे अतिक्रमण, नागरिकांचा विरोध सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शुक्रवारी नासुप्रचे पथक शताब्दी चौक येथील खासगी जागेवरील शिव मंदिराचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले. तेव्हा स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध केला. यावेळी स्थानिक नागरिकांच्यावतीने ले-आऊट मालकाने न्यायालयात ५० हजार रुपये भरण्याची तयारी दर्शविल्याने पथक आल्यापावली परत गेले. परंतु जातांना या मंदिराच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन व कार्यालयीन प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
शुक्रवारी नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अजनी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नव दुर्गा मंदिर, हावरापेठ पुल, बाबूलखेडा, दुर्गा माता मंदिर, ठाकरे यांच्या घराजवळ, रामेश्वरी, बाबुलखेडा, दुर्गा मंदिर, सुयोग नगर, बाबुलखेडा, चाबुकनाथ शिव मंदिर, शताब्दी चौक, रामनगर ७ बी, बाबुलखेडा या ठिकाणचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु केली असता स्थानिक नागरिकांनी आक्षेप दर्शविला व उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ७ दिवसांच्या आत ५० हजार रुपये इतकी रक्कम जमा करणार असल्याचे लेखी स्वरूपाचे पत्र नासुप्र अधिकाºयांना लिहून दिले. यानंतर न्यायालयाने आमचे बांधकाम अनधिकृत ठरविले तर आम्ही स्वत:च ते पाडू, असे आश्वासनही नागरिकांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथक कारवाई न करता परत गेले.
भूखंड आणि रस्त्याच्या वादात मंदिर
शताब्दीनगर येथील शिव मंदिराचे बांधकाम भूखंड आणि रस्त्याच्या वादात अडकले. सुरुवातीला याठिकाणी भूखंड दाखविण्यात आला. शुक्रवारी नासुप्र याठिकाणी रस्ता असल्याचे सांगत आहे. मंदिराला लागूनच बाजूलाच शताब्दी चौक ते बेलतरोडी या मुख्य मार्गावर ले-आऊट मालकाचा भूखंड आहे. त्यामुळे मंदिर तोडल्यानंतर ले-आऊट मालकाच्या भूखंडावर सुद्धा टाच येण्याचा धोका आहे. असे असताना याठिकाणी रस्ता नव्हताच, येथील नागरिकांना आरएलसोबत दिलेल्या मंजूर नकाशात भूखंडच दाखविण्यात आल्याचा दावा करीत आज त्यांनी नासुप्रच्या पथकाला कारवाईपासून रोखून धरले. आधी शहरातील मुख्य मार्गावरील अडथळा ठरत असलेले अतिक्रमण काढा नंतरच वसाहतीमधील भूखंड व सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील अतिक्रमित मंदिरांवर कारवाई करा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली.
त्रिशरण चौक एनआयटी मैदानातील पुतळा हटविला,नागरिकांनही केले सहकार्य
शुक्रवारी नासुप्रने मौजा. बाबुलखेडा येथील बॅनर्जी ले-आऊट, त्रिशरण चौक एनआयटी मैदानातील एक पुतळा हटविला. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील नासुप्रच्या अधिकाºयांना सहकार्य केले व या ठिकाणचे अतिक्रमण यशस्वीपणे काढण्यास मदत केली. ही कार्यवाही विभागीय अधिकारी (दक्षिण) अविनाश बडगे, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. सांख्ये यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली. यापूर्वी त्रिशरण चौकातील मुख्य पुतळा हटवण्यास गेलेल्या पथकाला मात्र नागरिकांचा तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.