डागा परिसराला अतिक्रमणाचा विळखा()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST2021-01-13T04:21:34+5:302021-01-13T04:21:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बाळांचा ...

Encroachment on Daga area () | डागा परिसराला अतिक्रमणाचा विळखा()

डागा परिसराला अतिक्रमणाचा विळखा()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बाळांचा मृत्यू झाला़. या घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, पूर्व व उत्तर नागपुरात डागा हे एकमेव प्रसूतिगृह असल्याने येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता, आग लागल्यास अग्निशमन विभागाचे वाहन पोहोचण्याला आडकाठी व्हायला नको, या दृष्टीने डागा परिसराचे अवलोकन केले असता, गेटपुढे विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. मेयो रुग्णालयाच्या गेटपुढेही ऑटो उभे केले जातात. अग्निशमन विभागाच्या वाहनाला रुग्णालयाच्या आवारात पोहोचण्यास येथील अतिक्रमण अडथळा ठरू शकते.

मेयो, मेडिकल व डागा रुग्णालय मुख्य रस्त्यांवर असल्याने रहदारीला अडथळा नाही. परंतु, डागा रुग्णालयाच्या गेटच्या आजूबाजूला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. चहा विक्रेते, रसवंती, पंक्चर दुरुस्ती व अन्य दुकानदारांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे तसेच फूटपाथवर फोर व्हीलर उभ्या ठेवल्या जातात.

महापालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत दररोज अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते. डागा परिसरातही अधूमधून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाते. अनेकदा माल व ठेले जप्त करण्यात आले. परंतु, पथक माघारी फिरले की, पुन्हा अतिक्रमण केले जाते. मेडिकल रुग्णालयाच्या आवारात अतिक्रमणाची गंभीर समस्या नाही. प्रवेशद्वारालगत विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. मेयो रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या लगत ऑटोरिक्षा उभ्या केल्या जातात. यामुळे रहदारीला अडथळा होतो.

.....

डागा रुग्णालयाला नोटीस

परिपूर्तता प्रमाणपत्र न घेतलेल्या रुग्णालयांंचे वेळोवेळी ऑडिट करून पूर्तता करण्यासंदर्भात नोटीस बजावल्या जातात. डागा रुग्णालयालाही नोटीस बजावण्यात आली आहे. २०१९ मध्ये डागाचे फायर ऑडिट केले होते. आवश्यक यंत्रणा उभारण्यास सांगितले होते. परंतु, पूर्तता केलेली नाही. काही रुग्णालये जुन्या इमारतीत आहेत. अशा इमारतीत आवश्यक असलेली यंत्रणा उभारणे अनेकांना शक्य होत नाही.

- बी.पी. चंदनखेडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

....

शेड्यूलनुसार मॉक ड्रिल

शहरातील रुग्णालयात अग्निशमन विभागामार्फत मॉक ड्रिल घेतली जाते. यातून अग्निशामक यंत्रणा व्यवस्थित सुरू आहे की नाही. याची माहिती होते. त्रुटी आढळून आल्यास संबंधित रुग्णालयांना तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले जाते. यासाठी संबंधित रुग्णालयानेही पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अशी माहिती अम्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Encroachment on Daga area ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.